वस्तू आणि सेवा करात पुन्हा घसरण

१ जुलै २०१७ पासून लागू झालेल्या नव्या करप्रणालीचा नोव्हेंबर हा पाचवा महिना होता.

नोव्हेंबरमध्ये ८०,८०८ कोटी कर-संकलन

आधीच्या तुलनेत कमी कर टप्प्यात आणलेल्या २०० हून अधिक वस्तू, मुदतीत विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांना कमी करण्यात आलेले शुल्क याचा फटका नोव्हेंबरमधील वस्तू व सेवा कर (जीएसटी) संकलनाला बसला आहे. या अप्रत्यक्ष कर संकलनामार्फत गेल्या महिन्यात जमा झालेला महसूल रोडावत ८०,८०८ कोटी रुपयांवर येऊन ठेपला आहे.

१ जुलै २०१७ पासून लागू झालेल्या नव्या करप्रणालीचा नोव्हेंबर हा पाचवा महिना होता. या दरम्यान वस्तू व कर संकलन आधीच्या, ऑक्टोबर महिन्यातील ८३,००० कोटी रुपयांच्या तुलनेत घसरले आहे.

वस्तू व सेवा कर परिषदेच्या नोव्हेंबरमधील बैठकीतच विविध २०० हून अधिक वस्तू कमी कर रचनेत समाविष्ट करण्यात आली होती. त्याचबरोबर दंड म्हणून व्यापाऱ्यांसाठी असलेले शुल्क शिथिल करण्यात आले होते. वस्तू व कर संकलनाचा ओघ लक्षात घेऊन पेट्रोल तसेच डिझेल नव्या कर रचनेत अंतर्भूत करण्याबाबत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सहमती दर्शविली आहे.

जुलै व सप्टेंबर वगळता इतर महिन्यांमध्ये वस्तू व सेवा कर संकलनात उतार नोंदला गेला आहे. पहिल्या महिन्यात आतापर्यंत सर्वाधिक, ९५,००० कोटी रुपये या कररूपात जमा झाले होते.

नोव्हेंबरमधील अप्रत्यक्ष कर म्हणून २५ डिसेंबपर्यंत ५३.०६ लाख परतावे दाखल केले आहेत. गेल्या महिन्यात भरपाई अधिभार म्हणून ७,७९८ कोटी रुपये सरकारी तिजोरीत आले आहेत. या व्यतिरिक्त १३,०८९ कोटी रुपये केंद्रीय वस्तू व सेवा कर, १८,६५० कोटी रुपये राज्य वस्तू व सेवा कर तसेच ४१,२७० कोटी रुपये हे आंतरराज्य वस्तू व सेवा कर म्हणून जमा झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gst taxes falling gst revenue