ग्राहकोपयोगी विद्युत उपकरणांच्या निर्मितीतील हॅवेल्सने नावीन्यपूर्ण एलईडी उपाययोजनांवर भर दिला असून, आगामी स्मार्ट सिटी प्रकल्पांचा कणा बनेल अशी पथदिव्यांसाठी एकात्मिक तंत्रप्रणाली विकसित केली आहे. यासाठी धोरणात्मक तंत्र-भागीदाऱ्या करीत, वेगवेगळ्या सात स्मार्ट सिटी प्रकल्पांसाठी सादरीकरणही केले असून, २० स्मार्ट शहरांमध्ये ही प्रणाली राबविण्याचे आहे.

प्रकाश उपकरणे व्यवसायात हॅवेल्सने गेल्या पाच वर्षांमध्ये २५ टक्क्यांच्या चक्रवाढ दराने प्रगती करीत एलईडी बाजारपेठेतील १४ टक्के हिस्सा कमावला असल्याचा दावा केला आहे. मार्च २०१७ पर्यंत कंपनीच्या प्रकाश उपकरण विभागाच्या १,००० कोटी रुपयांच्या उलाढालीत ७५ टक्के योगदान एलईडी दिव्यांचे आहे, असे हॅवेल्सचे कार्यकारी उपाध्यक्ष अनिल भसीन यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

वर्षांनुवर्षांच्या ऋणानुबंधाने सशक्त विणलेली वितरण यंत्रणा हे हॅवेल्सचे सामर्थ्य राहिले असून, बरोबरीने निरंतर संशोधन व विकास आणि उत्पादन नावीन्यता या बळावर स्पर्धेवर तिने मात केली आहे आणि पुढील दोन वर्षांत कंपनी एलईडी दिव्यांच्या बाजारपेठेत नेतृत्वस्थानी असेल, असा विश्वास हॅवेल्सच्या या विभागाचे व्यवसायप्रमुख अजय सराफ यांनी स्पष्ट केले. कंपनीच्या या उद्दिष्टाला पाठबळ म्हणून उत्पादन क्षमता दरमहा पाच लाख दिव्यांवरून वाढवून २५ लाख दिवे अशी वाढली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सर्व प्रकाश सुविधांसह एकाच इथरनेट केबलद्वारे दूरसंचार, इंटरनेट, वीज, एचव्हीएसी इ. सारख्या इतर सोयींसह एकत्रित केली जाऊ  शकेल, अशा इथरनेट सामर्थ्य (पीओई) प्रणालीच्या क्षेत्रात कार्यरत हॅवेल्स ही भारतातील एकमेव कंपनी असल्याचा सराफ यांनी दावा केला. यातून इमारतीतील तारांचे जंजाळ कमी होईल, विजेची बचत, कार्बन उत्सर्जनालाही आळा बसेल, असा त्यांचा दावा आहे. शिवाय हजारो वॅट्स वीज वाचविण्यात मदत होईल अशा पथदिव्यांसाठी अभिनव एलईडी उपाययोजनेच्या क्षेत्रातही कंपनी काम करीत आहे. पथदिव्यांसाठी मध्यवर्ती-नियंत्रित देखरेख प्रणाली (सीसीएमएस) यासाठी चाचणीपासून, आराखडा आणि प्रत्यक्ष कार्यान्वयनापासून थेट समाधान हॅवेल्सने प्रस्तुत केले आहे. या धर्तीचा नमुना प्रकल्प चंडीगढमध्ये सिस्कोच्या सहकार्याने हॅवेल्सने राबविला आहे. अन्य सात स्मार्ट शहरांसाठी त्याचे सादरीकरण केले गेले असून, नियोजित १०० पैकी २० स्मार्ट शहरांमध्ये ही प्रणाली राबविण्याचे हॅवेल्सचे स्वारस्य असल्याचे सराफ म्हणाले.

सीएफएल दिवे उत्पादनाला पूर्णविराम

परंपरागत आणि सीएफएल दिवे वर्ष अखेरीस उत्पादन-गुच्छातून नाहीसे झालेले दिसतील, अशी माहिती हॅवेल्सचे कार्यकारी उपाध्यक्ष अनिल भसीन यांनी दिली. प्रदूषणकारी आणि खर्चिक सीएफएल दिव्यांच्या निर्मितीला स्थगितीची प्रक्रिया सुरू झाल्याचे ते म्हणाले. सरकारही ऊर्जा-कार्यक्षम एलईडी उत्पादनांच्या वापरास प्रोत्साहन देत असून ते लोकांना सीएफएलपासून परावृत्त करीत आहे. म्हणूनच सीएफएल दिव्यांवर जाचक २८ टक्के वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) आहे, तर एलईडी दिव्यांसाठी तो १२ टक्के आहे, असे त्यांनी सांगितले.