देशातील सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँकेच्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. HDFC बँकेने मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, २ कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींवर ०.०५ ते ०.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. बँकेने १४ फेब्रुवारीपासूनच वाढीव व्याजदर लागू केले आहेत.

याशिवाय, एचडीएफसी बँकेने १ वर्षाच्या एफडीवरील व्याजदर ४.९ टक्क्यांवरून ५.० टक्के केला आहे. अशा प्रकारे बँकेने व्याजात ०.१० टक्के वाढ केली आहे. १ ते २ वर्षांच्या FD वर ५ टक्के आणि २ ते ३ वर्षांच्या FD वर ५.२ टक्के व्याजदर ठेवण्यात आला आहे.

बँकेने ५ वर्षांपर्यंतच्या एफडीवरील व्याजदरात ०.०५ टक्क्यांनी बदल केला आहे. आता ३ ते ५ वर्षांच्या FD वरील व्याजदर ५.४० टक्क्यांवरून ५.४५ टक्के करण्यात आला आहे. ५ ते १० वर्षांच्या FD वर व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. या कालावधीतील FD वर बँकेकडून ५.६० टक्के व्याज दिले जात आहे.

अर्थसंकल्पापूर्वी एसबीआयने वाढवले व्याजदर

अर्थसंकल्पापूर्वी देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक एसबीआयनेही एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती. बँकेने १ वर्षापेक्षा जास्त आणि २ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर ५ टक्क्यांवरून ५.१ टक्के केला आहे. यापूर्वी इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँका, सेंट्रल बँक आणि युको बँक यांनी एफडीवरील व्याजदरात वाढ केली होती.​​

१० वर्षांत FD व्याज दर सर्वात कमी पातळीवर

भारतातील ज्येष्ठ नागरिकांचा मोठा भाग त्यांना बँक एफडीमधून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेवर अवलंबून असतो. गेल्या १० वर्षांत एफडीचे व्याजदर कमालीचे खाली आले आहेत. २०११ मध्ये जेथे वृद्धांना सर्वाधिक ९.७५ टक्के व्याज मिळायचे. आता कमाल व्याजदर ६ टक्क्यांवर आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

RBI ने व्याजदरात कोणतेही बदल केला नाही

RBI बँकेने १० फेब्रुवारी रोजी वर्षातील पहिले पतधोरण जाहीर केले होते. नवीन पतधोरणात RBI ने व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर ४ टक्के आणि रिव्हर्स रेपो दर ३.३५ टक्के ठेवण्यात आला आहे.