देशातील तिसऱ्या क्रमांकाची बँक असलेल्या एचडीएफसी बँकेने जानेवारी ते मार्च २०१४ तिमाहीअखेर निव्वळ नफ्यात नोंदविलेली २३.१ टक्क्यांची वाढ ही बँकेच्या गेल्या दशकभराहून अधिक काळातील नफावाढीच्या कामगिरीतील नीचांक आहे. एचडीएफसी बँकेची वित्तीय कामगिरी आजवर खूप चमकदार राहिली नसली तरी सरासरी ३० टक्क्यांच्या दराने नफावाढीचे सातत्य तिने कायम राखले आहे. मंदावलेल्या अर्थव्यवस्थेने बँकेच्या आक्रसलेल्या व्यवसायाचे तिच्या यंदाच्या कामगिरीवर स्पष्ट सावट दिसत असून, परिणामी संयत परंतु एकूण अपेक्षेपेक्षा काहीसा कमी नफा तिने नोंदविला आहे.
मार्च तिमाहीत एचडीएफसी बँकेने २,३२६.५२ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो गेल्या वर्षीच्या याच तिमाहीत १,८८९.८४ कोटी रुपये होता. बँकेचे एकूण उत्पन्नही १४.९ टक्क्यांनी वाढून १२,७९० कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या तिमाहीत २०.३ टक्के कर्ज वितरणात वाढ साध्य केल्याने बँकेचे निव्वळ व्याजापोटी उत्पन्न मात्र दमदार १५.३ टक्क्यांनी वाढून ४,९५२.६० कोटी रुपयांवर गेले आहे. २०१३-१४ या संपूर्ण आर्थिक वर्षांत बँकेचा निव्वळ नफा मागच्या वर्षांच्या तुलनेत २६ ट वधारून ८,४७८.४० कोटी रुपये झाला आहे.
६.८५ रुपयांचा लाभांश!
एचडीएफसी बँकेच्या संचालक मंडळाने आपल्या भागधारकांना प्रत्येकी २ रु. दर्शनी मूल्याच्या समभागामागे ६.८५ रुपये लाभांश जाहीर केला आहे. गेल्या वर्षी ३१ मार्चअखेर बँकेने ५.५ रुपये लाभांश दिला होता.
समभागात १.७१% वाढ
मार्च तिमाहीत माफक नफावाढीच्या कामगिरीपोटी एचडीएफसी बँकेच्या समभागाने फारशी उत्साहवर्धक हालचाल दर्शविली नाही. मंगळवारी सकाळी बँकेची कामगिरी जाहीर झाली तेव्हा तो पावणेदोन टक्क्यांच्या घरात उसळून ७२९ रुपयांच्या दिवसातील उच्चांकाला पोहोचला. पण दिवसअखेर तो १.३६ टक्के वाढ दर्शवीत ७२६.३५ रुपयांवर स्थिरावला.