* रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दर कपातील पहिला प्रतिसाद
दहा दिवसांपूर्वी रिझव्‍‌र्ह बँकेने ताज्या मध्य तिमाही पतधोरणात कमी केलेल्या पाव टक्का रेपो दराला तब्बल दहा दिवसानंतर प्रतिसाद देताना खासगी क्षेत्रातील दुसऱ्या क्रमांकाच्या एचडीएफसी बँकने सर्वप्रथम व्याजदर कपात केली आहे. बँकेने किमान व्याजदर ०.१० टक्क्याने कमी केला आहे. नवा दर आता ९.७० ऐवजी ९.६० टक्के असेल. नव्या दराची अंमलबजावणी शनिवारपासूनच (३० मार्च) होत आहे. यामुळे बँकेचा प्राधान्य कर्ज दर (बीपीएलआर) १८.१० टक्क्यांवर येणार आहे.
‘देर आये दुरस्त आये’ या उक्तीप्रमाणे एचडीएफसी बँकेने व्याजदर कपातीच्या यंदाच्या हंगामाचा शुभारंभ करून दिल्याने अन्य बँकाही हाच कित्ता गिरविण्याची शक्यता आहे. १९ मार्च रोजी रिझव्‍‌र्ह बँकेने पाव टक्का रेपो दर कमी केल्यानंतर अनेक बँकांच्या प्रमुखांनी तूर्त गृह तसेच वाहन कर्ज स्वस्त करण्याची घाई नसल्याचे स्पष्ट केले होते. मेमध्ये मध्यवर्ती बँकेच्या नव्या पतधोरणातही हाच कल दिसल्यास त्याचा लाभ ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याची भूमिका अनेक राष्ट्रीयीकृत बँकांनीही घेतली होती.