पीटीआय, नवी दिल्ली : गृहवित्त क्षेत्रातील ‘एचडीएफसी’ने घरांसाठी कर्जाचे व्याज दर अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. रिझव्‍‌र्ह बँकेने पतधोरण मांडताना रेपो दरात अर्ध्या टक्क्याची वाढ केली आणि प्रतिक्रियेदाखल एचडीएफसीने गृह कर्ज महाग करणारे पाऊल लगोलग टाकले. एचडीएफसीने किरकोळ प्रधान ऋण दरातील (आरपीएलआर) ही वाढ शनिवार, १ ऑक्टोबरपासून लागू करीत असल्याचे म्हटले आहे.

गेल्या पाच महिन्यांच्या कालावधीत ‘एचडीएफसी’ने गृहकर्जाच्या दरात सातव्यांदा केलेली ही वाढ आहे. एचडीएफसी पाठोपाठ एलआयसी हाऊसिंग फायनान्स देखील गृहकर्जाच्या दरात अर्ध्या टक्क्यापर्यंत वाढीची घोषणा  केली. रिझव्‍‌र्ह बँकेच्या रेपो दरवाढीनंतर इतर वित्तीय संस्था-बँकांकडूनदेखील नजीकच्या काळात कर्जाच्या दरात वाढ अपेक्षित आहे.

‘आयसीआयसीआय’कडून ठेव-व्याजदरात वाढ

खासगी क्षेत्रातील आघाडीच्या आयसीआयसीआय बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवरील व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे. नवीन दर लगेचच, म्हणजे शुक्रवार, ३० सप्टेंबरपासून लागू करण्यात आले आहेत. आयसीआयसीआय बँकेच्या ७ ते २९ दिवसांची मुदतपूर्ती असलेल्या ठेवींवरील व्याजदर २.७५ टक्क्यांवरून ३ टक्के करण्यात आला आहे, तर ३० ते ९० दिवसांच्या ठेवींवर व्याजदर ३.२५ टक्क्यांवरून ३.५० टक्के करण्यात आला आहे.

याचबरोबर ९१ ते १८४ दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर आता ४.२५ टक्के दराने व्याज मिळेल. तसेच १ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर ४.९० टक्के व्याज मिळणार आहे. १ ते २ वर्षे मुदतपूर्ती असलेल्या ठेवींवर ५.७० टक्के आणि २ ते ३ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर ५.८० टक्के व्याज मिळेल. आयसीआयसीआय बँकेच्या दीर्घ कालावधीच्या ठेवींवर ५.९० ते ६.१० टक्क्यांपर्यंत व्याज मिळणार आहे.