पीटीआय, नवी दिल्ली : निर्मिती क्षेत्राबरोबरच सेवा क्षेत्रानेही गतिमानतेचा कित्ता गिरवत, सरलेल्या मे महिन्यात गेल्या ११ वर्षांतील उच्चांकी पातळी गाठणारी कामगिरी केली आहे. शुक्रवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, महागाईचा पारा वाढता असला तरी, नव्याने आलेला कामांचा ओघ व मागणीपूरक अनुकूलतेमुळे एकंदर सेवा क्षेत्राने उच्चांकी सक्रियता साधली आहे.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया सव्‍‌र्हिसेस पीएमआय’ निर्देशांक मे महिन्यात ५८.९ गुणांवर नोंदला गेला. या निर्देशांकाने नोंदविलेली ही ११ वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहे. एप्रिलमध्ये तो ५७.९ गुणांवर होता. सलग दहाव्या महिन्यात सेवा क्षेत्राची दमदार वाटचाल सुरू राहिली आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.

मे महिन्यात नवीन व्यवसायांच्या वाढीमुळे मागणी आणि उत्पादनात जलद वाढ झाल्याने सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक लक्षणीय उंचावला आहे. करोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर, मुख्यत: थेट संपर्कावर बेतलेले सेवा व्यवसाय वेगाने पूर्वपदावर आले आणि त्यांच्या मागणीत निरंतर वाढ होत असल्याने सेवा क्षेत्राच्या विस्ताराला अतिरिक्त गती मिळाली आहे. नवीन कार्यादेशांमध्ये जुलै २०११ नंतर दिसून आलेली ही सर्वाधिक जलद वाढ सरलेल्या महिन्यात नोंदविली गेली, असे निरीक्षण ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया’च्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी नोंदविले.

तथापि एकंदरीत सेवा तीव्र गतीने महागल्या असून त्यातील महागाई दर साडे १६ वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे आणि त्या परिणामी वाढत्या चलनवाढीच्या चिंतेमुळे व्यावसायिकांचा आत्मविश्वास कमी झाला आहे, असे सर्वेक्षणाने नमूद केले आहे. आगामी काळात देशांतर्गत व्यवसायांसाठी नवीन कार्यादेश व मागणीतील वाढ कायम राहाणार आहे. मात्र वाढत्या महागाईच्या दबावामुळे विस्तार मर्यादित राहाण्याची शक्यता आहे. सरलेल्या महिन्यात अन्नधान्य, इंधन दरवाढ, किरकोळ खर्च, कार्यालयीन साहित्य, कर्मचारी आणि वाहतूक यांवरील खर्च वाढल्याचे अहवालाचे निरीक्षण आहे.

परदेशातून मागणी घटली

मार्च २०२० मध्ये करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून भारतीय सेवांसाठी जागतिक मागणी कमी झाली आहे. भारतीय कंपन्यांच्या सेवांना परदेशातून मिळणाऱ्या मागणीमध्ये प्रत्येक महिन्यात घट होत असल्याचे ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया’च्या अहवालाने नमूद केले आहे.