पीटीआय, नवी दिल्ली : आर्थिक वर्षांतील अखेरच्या म्हणजेच मार्च महिन्यात देशाची निर्यात गत वर्षांच्या तुलनेत १९.७६ टक्क्यांनी उंचावत ४२.२२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. तर संपूर्ण आर्थिक वर्षांत निर्यातीने ४१९.६५ अब्ज डॉलरचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे, असे वाणिज्य मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केले. मार्च २०२१ मध्ये ३५.२६ अब्ज डॉलरची निर्यात नोंदविली गेली होती. तर सरलेल्या महिन्यात वस्तू आणि सेवांची आयातदेखील २४.२१ टक्क्यांनी वाढून ६०.७४ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे दोहोंतील तफावत अर्थात व्यापार तूट १८.५१ अब्ज डॉलरवर गेली आहे. ती गेल्या वर्षी याच महिन्यात (मार्च २०२१) १३.६४ अब्ज डॉलर होती.
वाणिज्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, मार्च २०२२ मध्ये सेवा क्षेत्रातून निर्यातीचे मूल्य ४.६४ टक्क्यांनी वाढून २१.७६ अब्ज डॉलरवर पोहोचले आहे. तर गेल्या महिन्यात देशाकडून झालेली सेवांची आयात ७.३३ टक्क्यांनी वाढून १३.१६ अब्ज डॉलर नोंदली गेली. सरलेल्या आर्थिक वर्षांत देशाने इतिहासात पहिल्यांदाच ४१९.६५ अब्ज डॉलरच्या निर्यातीचा टप्पा गाठला. पेट्रोलियम उत्पादने, अभियांत्रिकी, रत्ने-दागिने आणि रसायने यांसारख्या प्रमुख क्षेत्रांच्या सकारात्मक कामगिरीमुळे निर्यात ऐतिहासिक पातळीवर पोहोचली होती. चालू आर्थिक वर्षांत वस्तू आणि सेवांची आयातदेखील वाढून ६११.८९ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. यामुळे दोहोंतील तफावत अर्थात व्यापार तूट १९२.२४ अब्ज डॉलरवर गेली आहे.