मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने मर्यादित कालावधीसाठी गृहकर्जाच्या दरात पाव टक्क्यांच्या कपातीची शुक्रवारी घोषणा केली. बँकेकडून ३० जूनपर्यंत सवलतीच्या दराने गृहकर्ज दिले जाणार असून व्याजदर वार्षिक ६.७५ टक्क्यांवरून कमी करत ६.५० टक्के करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये घरांच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे ग्राहकांसाठी ६.५ टक्के या विशेष दराने कोणत्याही प्रक्रिया शुल्काविना कर्ज उपलब्ध करून देत आहोत, असे बँकेचे सरव्यवस्थापक एच. टी. सोलंकी यांनी सांगितले.

नव्याने गृहकर्ज घेणाऱ्या आणि शिल्लक गृहकर्जाच्या हस्तांतरणासाठी अर्ज करणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला या सवलतीच्या दराचा लाभ मिळणार आहे. अर्जदारांचा ‘सिबिल’ पतगुणांक मात्र ७७१ अथवा त्याहून अधिक असायला हवा. बँकेने याआधी ३१ मार्च २०२२ पर्यंत विशिष्ट कर्जदारांना ६.५ टक्के व्याजदराने गृहकर्ज देण्याची योजना राबविली होती व चालू महिन्यात १ एप्रिलपासून हा दर ६.७५ टक्क्यांपर्यंत नेला होता आणि आता पुन्हा तिने त्यात मर्यादित काळासाठी कपात केली आहे.