मुंबई : पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांनी ब्रिटनच्या महाराणीकडून ‘कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर (सीबीई)’ हा मानाचा पुरस्कार मिळविला आहे.  ‘यूके-इंडिया सीईओ फोरम’चे सह-अध्यक्ष म्हणून ब्रिटन आणि भारताचे व्यापार संबंधात सुदृढतेसाठी त्यांच्या कामगिरीचा यातून गौरव करण्यात आला आहे.

भारत-यूके सीईओ फोरमचे सह-अध्यक्ष म्हणून २०१६ पासून दोन्ही देशांमधील आर्थिक सहकार्याद्वारे द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी पिरामल कार्य करत आहेत. यामुळे दोन्ही राष्ट्रांमधील व्यापार, व्यवसाय आणि उद्योग भागीदारी वाढीस प्रोत्साहन मिळेल आणि येत्या काही वर्षांत द्विपक्षीय संबंध नवीन उंची गाठतील, अशी प्रतिक्रिया पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर अध्यक्ष अजय पिरामल यांनी व्यक्त केली.

पिरामल यांनी २०१९ मध्ये लंडनमध्ये संयुक्त आर्थिक आणि व्यापार समिती बैठक, २०१८ मध्ये राष्ट्रकुल देशांच्या प्रमुखांची बैठक आणि २०१६ मध्ये ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. याचबरोबर ब्रिटनमधील कामगार धोरणातील गतिशीलता, भारतीयांची ब्रिटनमधील गुंतवणूक जलद आणि सुकर व्हावी यासाठी यंत्रणा उभारण्यात आणि भारतातील कंपनी कराबाबत धोरण आखण्यात त्यांचा हातभार राहिला आहे.