रिझर्व बँकेने पंधरवडय़ावर येऊन ठेपलल्या पतधोरणात जर व्याजदर कपात केली तर ती देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देणारीच ठरेल, असे अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्या सूचक उद्गारामुळे शेअर निर्देशांक ‘सेन्सेक्स’ सप्ताहारंभी दीडशे अंशांच्या वाढीने महिन्याच्या उच्चांकावर जाऊन पोहोचला. एकूणच व्याजदराशी निगडित बँक, बांधकाम, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातील समभागांना खरेदीसाठी मागणी आणि त्यांचे भावही वाढताना दिसले.
भांडवली बाजाराने सलग दुसरी वाढ नोंदविली, इतकेच नव्हे निफ्टी निर्देशांकाने ५,८००च्या पल्याड दमदारपणे मजल मारली. तर मुंबई निर्देशांक दिवसअखेर १५३.३७ अंशवाढीसह १९,१६९.८३ वर गेला.
रिझर्व बँकेचे आगामी पतधोरण येत्या ३ मे रोजी जाहीर होत आहे. या प्रसंगी मध्यवर्ती बँक रेपोदरात किमान अर्धा टक्का कपात करेल, अशी आशा आहे. गेल्या काही कालावधीत औद्योगिक उत्पादनाचा दर घसरलेला असतानाच महागाईची धारही कमी होत असल्याने यंदा व्याजदरात नरमाई हवीच, अशी अपेक्षा उद्योग क्षेत्रातून व्यक्त केली आहे. त्यातच विदेश दौऱ्यावर असलेल्या अर्थमंत्री चिदम्बरम यांनीही यंदा होणारी व्याजदर कपात अर्थव्यवस्थेला हातभार लावणारी असेल, असे संकेत दिले. परिणामी, व्याजदराशी निगडित बँक, बांधकाम, वाहन, ग्राहकोपयोगी वस्तू निर्देशांकांसह भांडवली वस्तू, पोलाद, ऊर्जा क्षेत्रही तेजीत सामील झाले.

बाजार महिन्याभरापूर्वी १८ मार्च रोजी या उच्च टप्प्यावर होता. ‘सेन्सेक्स’मधील २० समभाग सोमवारी वधारले. येत्या महिन्यातील संभाव्य व्याजदर कपातीच्या आशेबरोबरच सोने धातूतील किंमत घसरणही विदेशी संस्थांगत गुंतवणूकदारांना भांडवली बाजारात निधी ओतण्यास भाग पाडत आहे, असे बोनान्झा पोर्टफोलियोचे वरिष्ठ उपाध्यक्ष राकेश गोयल यांनी म्हटले आहे.
आंतरराष्ट्रीय बाजार तेजीत असल्याचा फायदा घेत म्युच्युअल फंड व किरकोळ गुंतवणूकदारांनी भरघोस खरेदी केल्याने स्थानिक बाजारालाही बळ मिळाले; मात्र वधारलेल्या रुपयाची साथ माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांच्या घसरणींना मिळाली. डॉलरच्या तुलनेत रुपया वधारल्याने तेल विपणन कंपन्यांमध्ये वित्तीय संस्था गेल्या काही दिवसांपासून खरेदी करत आहेत, असे निरीक्षण ‘रुची इन्व्हेस्टमेन्ट’चे संचालक सचिन मुळे यांनी नोंदविले आहे. डॉलरच्या कमकुवतपणाबरोबरच अमेरिकेत होऊ घातलेल्या व्हिसा नियम बदलाबाबतही देशाच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगात चिंतेचे वातावरण आहे. विप्रो, टीसीएस, इन्फोसिसही घसरणीच्या यादीत होते.
डॉलर भक्कम; रुपया घसरला
रुपयातील ‘सी-सॉ’ कायम आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी पुन्हा १८ पैशांनी घसरत ५४.१४ पर्यंत खाली आला. गेल्या बुधवारीही स्थानिक चलनाने ७ पैशांची घसरण नोंदविली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल आणि सोने दर कमी झाल्याने त्याच्या खरेदीसाठी आयातदारांकडून अमेरिकी चलन- डॉलरला सप्ताहारंभी विलक्षण मागणी वाढली. त्याचबरोबर वधारत्या स्थानिक भांडवली बाजारात विदेशी संस्थांकडून गुंतवणूक (१६.९१ कोटी रुपये) ओतण्यासाठीही विदेशी चलनाची निकड उद्भवली. सशक्त बनलेल्या डॉलरच्या परिणामी रुपया मात्र ५४ चा तळ गाठताना दिसून आला.
*  आरकॉम वर्षांच्या उच्चांकाला
रिलायन्स ग्लोबलकॉममधील हिस्सा विक्रीसाठी नवा भागीदार मिळण्याबाबत आशावाद निर्माण झाल्याचे आणि याच कंपनीच्या समुद्राखालील ‘हॉक केबल’ प्रणालीसाठी प्रत्यक्षात पहिला ग्राहक मिळाल्याचा घटनाक्रम सोमवारी अनिल अंबानी समूहातील रिलायन्स कम्युनिकेशन्ससाठी फलदायी ठरला. या दोन्ही सकारात्मक वृत्ताने हा समभाग थेट १३.४७ टक्क्यांनी वधारत वर्षांच्या उच्चांकाला पोहोचला. दिवसअखेर भाव ९७.७० रुपयांवर स्थिरावला. बहरिन टेलिकम्युनिकेशन्समार्फत रिलायन्स ग्लोबलकॉमधील हिस्सा खरेदीबाबत मेअखेर व्यवहार होण्याची शक्यता आहे, तर याच कंपनीने सायप्रसमधील हबमार्फत समुद्राखाली टाकलेल्या केबल नेटवर्कचे इजिप्तनजीक कार्यान्वित होणे आणि तिला या सेवेसाठी सौदी अरेबियास्थित मोबीली कंपनी पहिली ग्राहक म्हणून मिळणे अपेक्षित आहे.
*  विप्रोचा समभाग आपटला
शुक्रवारी विप्रोने जाहीर केलेले तिमाही निकाल हे अपेक्षेपेक्षा कमी आल्याने गुंतवणूकदारांनी सोमवारी कंपनीच्या समभागाची जोरदार विक्री केली. परिणामी, पहिल्या तीन तासांच्या व्यवहारातच विप्रोचा भाव ११ टक्क्यांनी आपटून रु. ३२८वर रोडावले. समभागाचे बाजारमूल्य रु. ७,७१२ कोटींनी खालावले. दिवसअखेर समभाग सावरून ३३९.३५ वर स्थिरावला तरी घसरण ७.९५ टक्क्यांची, तर बाजारमूल्य ७,२२० कोटी रुपयांनी कमी होऊन ते ८३,५७६ कोटी रुपयांवर आले. एकूणच माहिती तंत्रज्ञान निर्देशांक आज २.३७ टक्क्यांनी खालावला.