भारतातील खासगी बँकिंग गुंडाळले
भारतात संपत्ती व्यवस्थापन पुरविणाऱ्या खासगी बँकिंग व्यवसाय गुंडाळण्याचा निर्णय ब्रिटनमधील एचएसबीसीने घेतला आहे. जागतिक स्तरावर कर्मचारी कपातीच्या माध्यमातून खर्च वाचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून विदेशी बँक करत आहे.
बँकेच्या नव्या निर्मयानुसार या विभागातील ७० कर्मचाऱ्यांना नारळ दिल्याचे समजते. तर विभागाचे नेतृत्व करणाऱ्या शंतनू आंबेडकर यांची नियुक्ती किरकोळ व्यवसाय विभागात करण्यात आली आहे.
याबाबतची घोषणा करताना बँकेच्या प्रवक्त्याने जागतिक खासगी बँकेच्या एकूण व्यवसायाचा आढावा घेताना भारताबाबत हा निर्णय घ्यावा लागल्याचे कर्मचाऱ्यांना गुरुवारी पाठविलेल्या ई-मेलमध्ये नमूद केले आहे.
एचएसबीसीचे भारतात ३२,००० कर्मचारी असून तिच्या देशातील व्यवसायातून गेल्या काही तिमाहींपासून फारसा लाभ नोंदविला जात नाही. जागतिक स्तरावर ब्रिटनच्या या बँकेने २०१६ च्या सुरुवातीला कर्मचारी कपात करण्याचे धोरण राबविण्याचे जाहीर केले होते.
एचएसबीसी बँकेच्या खासगी बँकिंग विभाग हा मार्च २०१६ पासून ठप्पच आहे. बँकेच्या जागतिक किरकोळ बँकिंग व्यवसाय असलेल्या एचएसबीसी प्रीमियरकडे जाण्याचे याबाबत बँकेच्या खातेदारांना सुचविण्यात आले होते. एचएसबीसीने भारतातील या विभागात उत्पादन तसेच सेवा वाढीसाही काही प्रमाणात गुंतवणूकही केली होती.
एचएसबीसीच्या बंद करण्यात येत असलेल्या विभागामार्फत ग्राहकांना विदेशातील संपत्ती व्यवस्थापन पुरविले जाते. यामध्ये म्युच्युअल फंड, रोखे आदी गुंतवणूक उत्पादनांचा समावेश आहे. आणखी एका विदेशी खासगी बँकेने भारतातील व्यवसाय गुंडाळण्याची घोषणा यापूर्वीच केली आहे. ब्रिटनच्याच रॉयल बँक ऑफ स्कॉटलॅन्डनेही तिचा खासगी बँकिंग व्यवसाय जूनमध्ये सॅन्क्टम वेल्थ मॅनेजमेन्ट कंपनीला विकला. तसेच अमेरिकेच्या मॉगर्न स्टॅनलेनेही यापूर्वीच देशातील व्यवसाय आकुंचन केले आहे.