स्टेट बँक व अॅक्सिस बँकेपाठोपाठ, खासगी क्षेत्रातील अग्रणी आयसीआयसीआय बँकेच्या समभागांचे प्रस्तावित विभाजन येत्या ५ डिसेंबरपासून अंमलात येईल. विभाजनाच्या तारखेच्या निश्चितीच्या शुक्रवारी झालेल्या या घोषणेने शेअर बाजारात बँकेच्या समभागाने तीन टक्क्य़ांपर्यंत भाववाढ मिळविली.
आयसीआयसीआय बँकेच्या सध्या १० रु. दर्शनी मूल्य असलेल्या समभागाचे २ रु. दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येकी ५ समभागांमध्ये विभाजन ५ डिसेंबरपासून अंमलात येईल. म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत बँकेचे समभाग हाती असलेल्या गुंतवणूकदारांना त्यांच्याकडील प्रत्येक समभागामागे बँकेचे पाच समभाग प्राप्त होतील. भांडवली बाजारात होणाऱ्या व्यवहारात अधिक तरलता यावी यासाठी, विद्यमान सालात समभाग विभाजनाचा मार्ग स्वीकारणारी आयसीआयसीआय बँक ही सातवी बँक आहे. गुरुवारपासून स्टेट बँकेचे (१:१०), तर अॅक्सिस बँक (१:५) आणि जम्मू अँड काश्मीर बँक (१:१०) यांचेही समभाग विभाजन यापूर्वी अंमलात आले आहे, तर पंजाब नॅशनल बँक (१:५), कॅनरा बँक (१:५), कॉर्पोरेशन बँक (१:५) या बँकांचे विभाजन नियोजित आहे.
आयसीआयसीआय बँकेचा समभाग मुंबई शेअर बाजारात २.६६ टक्क्य़ांनी वाढून १,७३४ रुपये, तर राष्ट्रीय शेअर बाजारात २.८२ टक्क्य़ांनी वाढून १,७३६ रुपयांवर शुक्रवारअखेर स्थिरावला. दिवसाच्या व्यवहारात त्याने १,७४२ रुपये असा वार्षिक उच्चांकी स्तरालाही गवसणी घातली.