मुंबई : करोना रुग्णसंख्येत घट, लसीकरणाने पकडलेला वेग आणि अर्थव्यवस्थेत होत असलेल्या सुधारणांच्या पाश्र्वभूमीवर पतमानांकन संस्था ‘इक्रा’ने भारताच्या आर्थिक विकास दराच्या अंदाजात सुधारणा केली आहे.

 आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ९ टक्क्यांवर जाईल, असा ‘इक्रा ’ने सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. याआधी अर्थव्यवस्था ८.५ टक्के दराने प्रगती करेल, असे तिचे अनुमान होते. उद्योगांची चाके वेगाने फिरू लागली आहेत. शिवाय खरिपाची पिके चांगली राहण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने देशाच्या अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी विविध क्षेत्रांना प्रोत्साहन दिलासा देत सरकारच्या खर्चात वाढ केली आहे. उशिरा पेरणीमुळे खरिपाच्या लागवड क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत विक्रमी वाढ झाली आहे. चांगल्या खरीप हंगामामुळे कृषी क्षेत्रासाठी वापरल्या जाणाऱ्या सेवा आणि वस्तूंना तसेच एकंदर ग्रामीण भागात मागणी वाढण्याची शक्यता आहे. २०२१-२२ मध्ये पीक उत्पादनाबाबत पूर्वअंदाजानुसार खरिपाच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. परिणामी आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत अर्थव्यवस्थेमध्ये मोठय़ा प्रमाणावर सुधारणा होण्याची आशा आहे, असे मत ‘इक्रा’ने नोंदविले आहे.