मुंबई : सरकारने भांडवली खर्चात मोठय़ा प्रमाणावर वाढ केल्याचे अर्थव्यवस्थेवर सुपरिणाम दिसण्याची आशा आहे. परिणामी पतमानांकन संस्था ‘इक्रा’ने भारताच्या आर्थिक विकास दराच्या अंदाजात सुधारणा केली आहे.

आर्थिक वर्ष २०२१-२२ च्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर ७.९ टक्कय़ांवर जाईल, असा ‘इक्रा’ने सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. याआधी जुलै-सप्टेंबर या तिमाहीत अर्थव्यवस्था ७.७ टक्के दराने प्रगती करेल, असे तिचे अनुमान होते.

करोना रुग्णसंख्येत घट, लसीकरणाने पकडलेला वेग आणि मोठय़ा प्रमाणावर होत आलेल्या आर्थिक सुधारणांमुळे उद्योगांची चाके वेगाने फिरू लागली आहेत. वाढलेल्या लसीकरणामुळे सर्वच क्षेत्रातील आत्मविश्वास वाढला आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी भांडवली खर्चात केलेली वाढ, वस्तू आणि सेवांच्या निर्यातीमध्ये झालेली वाढ आणि कृषी क्षेत्राकडून देखील मागणीत सतत वाढ होत असल्याने सरलेल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेच्या विस्तारासाठी पूरक वातावरण निर्माण झाले, असे मत ‘इक्रा’च्या मुख्य अर्थतज्ज्ञ अदिती नायर यांनी व्यक्त केले.

चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीत आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या परिस्थितीच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत परिस्थितीत अधिक सुधारणा झाली असल्याचे निरीक्षण नायर यांनी नोंदविले.

केंद्र सरकारच्या व्याजेतर महसुली खर्चात चालू आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्या तुलनेत पहिल्या तिमाहीत हा खर्च ७.३ टक्क्यांनी आक्रसला होता. उपलब्ध माहितीनुसार, देशातील २२ राज्य सरकारांनी आर्थिक वर्ष २०२२च्या दुसऱ्या तिमाहीत महसुली खर्च १३.१ टक्कय़ांनी वाढविला आहे. या तिमाहीत, उद्योग-सेवा आणि कृषी-वनीकरण आणि मासेमारी क्षेत्रातील वाढीचा दर अनुक्रमे ८.५ टक्के, ७.९ टक्के आणि ३ टक्के राहण्याचा आशावादी अंदाज ‘इक्रा’ने वर्तविला आहे.