वॉशिग्टन : आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (आयएमएफ) ३१ मार्च रोजी संपणाऱ्या २०२१-२२ या चालू आर्थिक वर्षांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा सुधारित अंदाज वर्तविताना तो ९ टक्क्यांपर्यंत खालावत आणला आहे. करोनाच्या नवीन उत्परिवर्तित विषाणूच्या प्रसार आणि उद्रेकाचे व्यवसाय क्रियाकलाप आणि अर्थचक्राच्या गतीवरील परिणामाच्या चिंतेतून हे सुधारित अंदाज आले आहेत.

मंगळवारी नाणेनिधीने प्रसिद्ध केलेल्या जागतिक आर्थिक दृष्टिकोनाच्या ताज्या अद्ययावत अहवालात हे सुधारित अंदाज वर्तविण्यात आले आहेत. वॉिशग्टनस्थित या आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारतासाठी ९.५ टक्के अर्थव्यवस्था (जीडीपी) वाढीचा अंदाज व्यक्त केला होता, तर पुढील आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी (एप्रिल २०२२ ते मार्च २०२३) साठी अंदाज ७.१ टक्क्यांचा तिचा अंदाज आहे. करोनाच्या दाट छायेतील २०२०-२१ या आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था ७.३ टक्क्यांनी आक्रसली होती.

चालू आर्थिक वर्षांसाठी नाणेनिधीचा हा सुधारित अंदाज सरकारच्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या ९.२ टक्के आणि रिझव्‍‌र्ह बँकेच्या ९.५ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा कमी आहे. शिवाय तो एस अँड पीच्या ९.५ टक्के आणि मूडीजच्या ९.३ टक्के अंदाजापेक्षा कमी आहे. तथापि जागतिक बँकेच्या ८.३ टक्के आणि फिचच्या ८.४ टक्क्यांच्या अंदाजापेक्षा तो जास्त आहे.

पुढील आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी वर्तविलेला ७.१ टक्क्यांचा अंदाजही, भारतात पतपुरवठय़ातील संभाव्य वाढ आणि त्या परिणामी खासगी क्षेत्रातून गुंतवणूक आणि उपभोगात अपेक्षित सुधारणा, वित्तीय क्षेत्राच्या अपेक्षेपेक्षा चांगल्या कामगिरीवर आधारित असल्याचे नाणेनिधीने स्पष्ट केले आहे.