औषधांवरील बंदीने खळबळ

औषधी उद्योगानेही निर्णय घेण्याआधी संबंधित कंपन्यांशी विचारविनिमय केला गेला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.

फायझरच्या ‘कोरेक्स’ला न्यायालयीन दिलासा; औषध विक्रेत्यांकडून निषेधाचा सूर

केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने विशेष अधिसूचनेद्वारे ३४३ औषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर तात्काळ बंदी लागू करून, देशभरात औषधी क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. केंद्राने उत्पादक, वितरक आणि विक्रेत्यांना विश्वासात न घेता एकतर्फी घेतलेला हा तुघलकी निर्णय असल्याचे म्हणत औषध विक्रेत्यांची संघटना ‘ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट’ने त्याविरोधात दंड थोपटले आहेत. फायझर आणि अ‍ॅबट या विदेशी कंपन्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली, पैकी फायझरने आपल्या ‘कोरेक्स’ या खोकल्यावरील औषधासाठी न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती आदेश सोमवारी मिळविला आहे.

बंदी आणलेल्या औषधांचा बाजारामध्ये आणि विक्रेत्यांकडे उपलब्ध साठय़ाचा बाजारभाव हा ७,००० कोटी रुपयांच्या घरात जाणारा आहे. मागील २५ वर्षांपासून वापरात असलेली औषधे अकस्मात मानवी वापरासाठी अपायकारक असल्याचे ठरवून त्यांची विक्री ताबडतोबीने थांबविण्याच्या आदेशाने ७,००० कोटी रुपयांची औषधे नष्ट करावी लागणार आहेत. याचा फटका वितरण प्रणालीत सामील आठ लाखांपेक्षा अधिक औषध विक्रेत्यांना सर्वाधिक बसणार आहे, असे नमूद करीत औषध विक्रेत्या संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी या निर्णयावर टीका केली.

औषधी उद्योगानेही निर्णय घेण्याआधी संबंधित कंपन्यांशी विचारविनिमय केला गेला नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. वर्षभरापासून सुमारे ६,२०० औषधींचे मूल्यांकन तज्ज्ञ समितीकडून सुरू होते. या समितीच्या शिफारशींना मान्यता देऊन    अधिसूचना काढण्याआधी हे सहज शक्य होते.

अपायकारक औषधी असतील तर त्यावरील बंदीला विरोध नाही, मात्र नियामक व्यवस्था ही संयत स्वरूपात निर्णय घेणारी आणि निर्णयप्रक्रिया पारदर्शी असायला हवी अशी अपेक्षा अनाठायी नाही, असे इंडियन फार्मास्युटिकल्स असोसिएशनचे डी. जी. शहा यांनी सांगितले.

या निर्णयाची अंमलबजावणी करताना प्रत्येक विक्रेत्याकडे उपलब्ध असलेला साठा जमा करून तो उत्पादकाला सुपूर्द करणे हे अत्यंत अव्यवहार्य, पैसा व मनुष्यबळ खर्ची घालणारे असून, सरकारला निश्चित असा मुदत कालावधी देऊन तो वाचविता आला असता, असे शिंदे यांनी सांगितले. शिवाय अंमलबजावणीच्या नावाखाली कारवाईचे हत्यार उपसण्याचे आणखी एक साधन औषध प्रशासनाला या निमित्ताने बहाल केले गेले आहे, असे ते म्हणाले.

‘विक्स अ‍ॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ला चिरनिद्रा

नवी दिल्ली : केंद्राच्या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून प्रॉक्टर अँड गॅम्बलने आपली ३३ वर्षे जुनी आणि लोकप्रिय नाममुद्रा ‘विक्स अ‍ॅक्शन ५०० एक्स्ट्रा’ची निर्मिती ताबडतोबीने बंद करीत असल्याचे मंगळवारी जाहीर केले. मुंबई शेअर बाजारालाही या निर्णयाची सूचना कंपनीने दिली.

औषध कंपन्यांच्या समभागांना घरघर

आघाडीच्या नाममुद्रांवर विविध कारणांनी सरकारमार्फत लादलेल्या र्निबधांनंतर प्रवर्तक कंपन्यांचे समभाग मूल्य मंगळवारी भांडवली बाजारात कमालीचे अस्वस्थ झाले. प्रॉक्टर अ‍ॅण्ड गॅम्बलच्या (पी अ‍ॅण्ड जी) विक्स अ‍ॅक्शन ५०० एक्स्ट्रा या लोकप्रिय उत्पादनासह फायझरच्या कोरेक्स या कफ सिरपवरील तातडीच्या विक्री र्निबधानंतर त्यांचे समभाग मूल्य ३ टक्क्यांपर्यंत घसरले. सोमवारी ९ टक्क्यांपर्यंत घसरलेला फायझरचा समभाग मंगळवारी वर्षभराच्या तळात पोहोचला. अ‍ॅबटनेही फेनसेडलची विक्री थांबविली आहे. आरोग्यनिगा निर्देशांक ३ टक्क्यांपर्यंत घसरला.

ल्युपिन        रु.१,७२६.६०    ३ ७.५९%

अरबिंदो         रु.७१०.००     ३ ३.४१%

फायझर        रु.१,७०५.३०    ३ ३.१५%

डॉ. रेड्डीज       रु.३,१३८.६५    ३ २.९६%

कॅडिला        रु. ३३८.६५    ३ २.८४%

सिप्ला         रु. ५२३.७०    ३ २.४८%

सन फार्मा       रु. ८४३.९०    ३ २.३३%

ग्लेनमार्क       रु. ८१३.६०    ३२.०८%

औषध          बंदीमुळे

कंपनी          नुकसान

अ‍ॅबट हेल्थकेअर  ४८५

मॅकलॉइड फार्मा  ३७०

फायझर        ३६८

मॅनकाइंड       २५३

अल्केम        १६१

इप्का          १३०

ग्लेनमार्क       ११०

वॉखार्ट         १०२

——  कोटी रुपयांत ——

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Immediate ban on 343 drugs indian