पीटीआय, नवी दिल्ली : देशातील आघाडीची दुचाकी कंपनी असलेल्या हिरो मोटोकॉर्पवर प्राप्तिकर विभागाने बुधवारी छापे टाकले. करचुकवेगिरी केल्याच्या संशयाखाली ही कारवाई केली गेली असल्याचे समजते. हिरो मोटोकॉर्पचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पवन मुंजाल यांच्यासह, प्रवर्तकांच्या कार्यालयावर आणि घरावर प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकत काही आर्थिक दस्त आणि कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. कंपनीने करचुकवेगिरी केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाने व्यक्त केला आहे. त्याअनुषंगाने अध्यक्षांसह इतर प्रवर्तकांच्या आर्थिक व्यवहारांची प्राप्तिकर विभागाकडून माहिती घेण्यात येत आहे.

कंपनीच्या दिल्ली, गुडगांव येथील कार्यालयात प्राप्तिकर विभागाचे तपास पथक बुधवारी सकाळी दाखल झाले. त्यांच्याकडून आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यात आली. मात्र हिरो मोटोकॉर्प कंपनीकडून अधिकृतपणे प्राप्तिकर विभागाच्या छाप्याबाबत कोणतीही माहिती सायंकाळी उशिरापर्यंत दिली नाही. हिरो मोटोकॉर्प दुचाकी निर्मिती क्षेत्रातील आघाडीची कंपनी असून तिने देशांतर्गत बाजारसह जागतिक बाजारात १० कोटींहून अधिक दुचाकींची विक्री केली आहे. कंपनीने आशिया, आफ्रिका आणि दक्षिण आणि मध्य अमेरिकेतील ४० देशांमध्ये वाहनांची विक्री करत दुचाकी निर्मितीमध्ये दबदबा कायम राखला आहे.

समभाग आपटला!

बुधवारच्या सत्रात हिरो मोटोकॉर्पचा समभाग दिवसअखेर २९ रुपये म्हणजेच १.२० टक्क्यांच्या घसरणीसह २,३९४.६५ पातळीवर स्थिरावला. दिवसभरातील सत्रात समभागाने २,३२७.२० रुपयांचा तळ गाठला होता.