काल झालेल्या एप्रिल महिन्याच्या सौदापूर्ती व्यवहारानंतर आलेला आठवडय़ाचा शेवटचा दिवस म्हणून गुंतवणूकदारांनी शुक्रवारी जोरदार समभाग विक्री करून नफा कमावून घेतला. परिणामी सेन्सेक्सने १२०.१३ अंशांची आपटी खाल्ली आणि तो दिवसअखेर १९२८६.७२ वर येऊन ठेपला, तर निफ्टी ४४.८५ अंश घसरणीमुळे ५,८७१.४५ वर बंद झाला. गेल्या चार सत्रातील तेजीपायी बाजाराने सहा आठवडय़ांपूर्वीच्या टप्प्याला पुन्हा गवसणी घातली होती. शेअर बाजाराची आगामी आठवडय़ातील हालचाल रिझव्‍‌र्ह बँकेच्या पतधोरणावर अवलंबून असेल.
व्याजदर कपातीच्या आशेवर गेल्या चार सत्रात मुंबई शेअर बाजार तेजीच्या वाटेवर प्रवास करत होता. असे करताना तो १९,५०० नजीकही पोहोचला होता. सप्ताहाचा शेवट मात्र त्याने घसरणीने केला. ‘अमेरिकेतील संभाव्य कायदेबदलामुळे बाजारात आयटी समभाग अद्यापही दबावाच्या खाली आहेत; तर अपेक्षेपेक्षा चांगले तिमाही निकाल देणाऱ्या मारुती, एलआयसी हाऊसिंग फायनान्ससारख्या कंपन्यांमध्ये नफेखोरी झालेली पाहायला मिळाली’, असे कोटक सिक्युरिटीजचे विश्लेषक दीपेन शाह यांनी सांगितले.
रिलायन्स, आयसीआयसीआय बँक, हिंदुस्थान युनिलिव्हर, स्टेट बँक या आघाडीच्या समभागांची विक्री करत गुंतवणूकदारांना फायदा कमावला. घसरलेल्या बाजारात वाहन, भांडवली वस्तू निर्देशांक वगळता अन्य निर्देशांकांची नकारात्मक कामगिरी राहिली. तर बाजाराचे व्यवहार सुरू असतानाच भरघोस फायद्याचे तिमाही निकाल जाहीर करणाऱ्या मारुती सुझुकीचा समभाग दिवसअखेर तब्बल ५.२ टक्क्यांनी उंचावला. वधारणाऱ्या समभागांमध्ये बजाज ऑटो, भारती एअरटेलही सहभागी झाले. पतमानांकन संस्था इक्रा आणि एशियन पेंट्स या समभागांचे मूल्य विभाजनाच्या चर्चेने वधारले.