एक्स्प्रेस वृत्त, मुंबई : रिलायन्स कॅपिटलच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत असून कंपनीच्या लिलाव प्रक्रियेतून आघाडीच्या पाच मोठय़ा बोलीदारांनी माघार घेतली आहे. अनिल अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कॅपिटल सध्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असून कंपनीच्या अधिग्रहणाच्या प्रक्रियेतून ब्लॅकस्टोन, एचडीएफसी एर्गो, आयसीआयसीआय लोम्बार्ड आणि टाटा समूहाची विमा कंपनी आणि अदानी समूहाने माघार घेतली आहे. रिलायन्स कॅपिटलच्या मालमत्ता खरेदीसाठी मार्चमध्ये ५४ कंपन्यांनी उत्सुकता दर्शविली होती. आता पिरामल एंटरप्रायझेससह केवळ पाच बोलीदार रिलायन्स कॅपिटलच्या खरेदीसाठी उत्सुक आहेत. टाटा सन्सची उपकंपनी असलेल्या टाटा एआयजी जनरल इन्शुरन्स कंपनीने याआधी रिलायन्स कॅपिटलच्या सामान्य विमा कंपनीच्या खरेदीसाठी उत्सुकता दर्शविली होती.

 सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पिरामल एंटरप्रायझेससह येस बँक आणि  टोरेंट समूहाशीदेखील बोलणी सुरू आहे. याचबरोबर झुरिच इन्शुरन्सने रिलायन्स कॅपिटलच्या सामान्य विमा व्यवसायासाठी आणि चोलामंडलम समूहाने आयुर्विमा व्यवसायासाठी स्वारस्य दाखवले आहे. रिलायन्स कॅपिटलसाठी बोली

लावणाऱ्या बोलीदारांसमोर कंपनीच्या संपूर्ण मालमत्तेसाठी किंवा त्याच्या एक किंवा अधिक व्यवसायासाठी (सहयोगी कंपन्या) बोली लावण्याचे असे दोन पर्याय ठेवण्यात आले आहेत. त्यांच्या उपकंपन्यांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स, रिलायन्स निप्पॉन लाइफ इन्शुरन्स, रिलायन्स अ‍ॅसेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी, रिलायन्स सिक्युरिटीज, रिलायन्स कमर्शियल फायनान्स आणि रिलायन्स होम फायनान्स यांचा समावेश आहे.

नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढ

रिलायन्स कॅपिटलच्या संपादन प्रक्रियेला बोलीदारांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने बोली लावण्यासाठी अंतिम मुदत दोन महिन्यांनी वाढवून २ नोव्हेंबर करण्यात आली आहे. याआधी ती ११ जुलै निश्चित करण्यात आली होती.