देशांतर्गत हवाई प्रवासात ऑगस्टमध्ये १३१ टक्क्यांनी वाढ

बहुतांश राज्यात प्रवासी वाहतुकीवर काही मर्यादा आहेत.

मुंबई : देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीत निरंतर वाढ सुरू असून, गेल्या महिन्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये त्यात ३१ टक्क्यांनी वाढ, तर ऑगस्ट २०२० च्या तुलनेत तब्बल १३१ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. करोना साथीचा प्रादुर्भाव घटल्याने आणि अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असल्याचे प्रतिबिंब हवाई प्रवासी वाहतुकीत पडले आहे.

पतमानांकन संस्था ‘इक्रा’च्या मते जुलै २०२१ मध्ये देशांतर्गत प्रवासी वाहतूक ५१ लाख होती. ती सरलेल्या ऑगस्टमध्ये वाढून ६६ लाखांवर गेली. तर वार्षिक आधारावर म्हणजेच गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात देशांतर्गत हवाई प्रवासी संख्या अवघी २८.३ लाख होती, ज्यामध्ये १३१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

प्रवासी संख्येत महिना दर महिना वाढ होत असली तरी अजूनही करोना निर्बंधांमुळे आवश्यक आणि तातडीच्या कामांसाठीच हवाई प्रवासाला परवानगी असल्याने हवाई सेवा पूर्ण क्षमतेने सुरू होऊ  शकलेली नाही, असे इक्राच्या उपाध्यक्षा किंजल शहा यांनी सांगितले.

ऑगस्ट २०२१ मध्ये प्रत्येक उड्डाण घेतलेल्या विमानामध्ये सरासरी प्रवाशांची संख्या ११४ होती, तर जुलै २०२१ मध्ये हीच सरासरी १०६ प्रवासी अशी होती. अजूनही बहुतांश राज्यात प्रवासी वाहतुकीवर काही मर्यादा आहेत. परिणामी, देशांतर्गत हवाई प्रवासी वाहतुकीत हवी तितकी वाढ झालेली नाही. ऑगस्ट २०२१ मध्ये विमानांची प्रस्थानांची ५७,५०० संख्या ही ज्या गेल्यावर्षीच्या ऑगस्टमधील २८,८३४ प्रस्थानांच्या तुलनेत ९९ टक्क्यांनी जास्त आहे. सरलेल्या ऑगस्टमध्ये दिवसाला विमानांची सरासरी १,९०० प्रस्थाने झाली. गेल्या वर्षी याच काळात हे प्रमाण ९०० प्रस्थाने असे होते. जुलै २०२१ मध्ये १,५०० प्रस्थाने झाली. तर एप्रिल २०२१ मध्ये दर दिवशी सरासरी २,००० प्रस्थाने झाली.

भाडेवाढ परिणामशून्य

विमान भाडेवाढीचा प्रवासी संख्येवर कोणताही परिणाम दिसला नाही आणि इक्राच्या मते, दिसणारही नाही. सद्य:स्थितीत फक्त आवश्यक व तातडीच्या कामांसाठी प्रवास मर्यादित आहे. विविध राज्यांमध्ये विविध प्रकारच्या निर्बंधांमुळे अजूनही देशांतर्गत हवाई प्रवास पूर्ण क्षमतेने सुरू झालेला नाही. मात्र पिचलेल्या विमान कंपन्यांना भाडेवाढीने दिलासा दिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Increase in domestic air travel in august akp