नवी दिल्ली : खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने मंगळवारी रिझव्र्ह बँकेच्या द्विमासिक आढावा बैठकीचा निर्णय येण्यापूर्वीच, निधीवर आधारित कर्ज दर (एमसीएलआर) ०.३५ टक्क्यांनी वाढवून ८.०५ टक्क्यांवर नेला आहे. बँकेची ही व्याजदरातील वाढ मंगळवारपासूनच (७ जून) लागू झाली असून, बँकेच्या गृह, वाहन, वैयक्तिक अशा सर्व ग्राहक कर्जदारांवरील हप्तय़ाचा भार यातून वाढणार आहे.
महागाईवर नियंत्रणासाठी रिझव्र्ह बँकेने मे महिन्यात रेपो दरात ४० आधार बिंदूंची वाढ केल्यापासून महिनाभराच्या अवधीत एचडीएफसी बँकेने कर्जावरील व्याजदरात ०.६० टक्क्यांची वाढ केली आहे. बुधवारी रिझव्र्ह बँकेचे पतधोरण जाहीर होणार असून मध्यवर्ती बँकेकडून पुन्हा व्याजदर वाढ होण्याची शक्यता आहे. त्या आधीच एचडीएफसी बँकेने व्याजदरात वाढ केली आहे.
कॅनरा बँकेने एमसीएलआर आधारित कर्जदरात वाढ करून तो ७.४० टक्के पातळीवर नेला आहे. हे व्याजदर मंगळवारपासून लागू झाले आहेत. गेल्या आठवडय़ात पंजाब नॅशनल बँक आणि बँक ऑफ इंडियाने व्याजदरात वाढ केली होती.