मुंबई : सार्वजनिक परिवहन सेवांच्या बस, रेल्वे, विमानतळ आणि मॉल्स तसेच उद्योग क्षेत्र यासारख्या मोठे वापरकर्ते आणि खरेदीदारांसाठी डिझेलच्या दरात रविवारी एका दमात २५ रुपये प्रति लिटर अशी दरवाढ तेल वितरक कंपन्यांकडून करण्यात आली. या दरवाढीमुळे डिझेलचे दर मुंबईत घाऊक खरेदीदारांसाठी प्रतिलिटर १२२.०५ रुपयांवर पोहोचले आहेत. अशा वापरकर्त्यांच्या परिचालन खर्चात तब्बल २७ टक्क्यांनी वाढ होईल, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या किमती गेल्या काही दिवसात ४० टक्क्यांनी वधारल्याने ही दरवाढ झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामी ब्रेंट क्रूडच्या दराने गेल्या १४ वर्षांतील उच्चांक मोडीत काढत चालू महिन्यात १४० डॉलर प्रतिपिंपाचा टप्पा गाठला होता. तरी युद्धाच्या आधीपासून किमती तापू लागल्या होत्या. तर दुसरीकडे पाच राज्यातील विधानसभा निवडणुका पाहता, देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या विक्री किमतीत नोव्हेंबरपासून कोणतीही वाढ करण्यात आलेली नव्हती. आता त्याची भरपाई म्हणून तेल कंपन्यांनी मोठय़ा वापरकर्त्यांना एकदम मोठय़ा दरवाढीचा धक्का दिला आहे.

खासगी पेट्रोप पंपांवर बंदीचे सावट.. 

घाऊक खरेदी करणारे बस आणि माल वाहतूकदार, मॉल्स यांच्यासारखे मोठे वापरकर्ते नेहमीच तेल कंपन्यांकडे थेट इंधनाची मागणी करतात. मात्र ताज्या दरवाढीनंतर त्यांनी इंधन खरेदी करण्यासाठी पेट्रोल पंपांवर रांगा लावत असल्याने पेट्रोल पंपावरील विक्रीत मोठी वाढ झाली आहे. यामुळे किरकोळ विक्रेत्यांना नुकसान सहन करावे लागते आहे. सर्वाधिक नुकसान खासगी विक्रेते असलेले नायरा एनर्जी, जिओ-बीपी आणि शेल सारख्या छोटय़ा विपणन कंपन्यांना बसत आहे.  सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून विकल्या जाणाऱ्या इंधनाच्या दराशी स्पर्धा करू शकत नसल्याने खासगी तेल विपणन कंपन्यांची विक्री जवळपास शून्यावर आली होती. यामुळे रिलायन्सने २००८ मध्ये देशातील सर्व १४३२ पेट्रोल पंप बंद केले होते. मोठय़ा प्रमाणात घाऊक वापरकर्ते पेट्रोल पंपांकडे वळवल्यामुळे छोटय़ा स्पर्धकांचे नुकसान वाढत असल्याने अशीच परिस्थिती पुन्हा निर्माण होण्याची शक्यता आहे.

महागाई उच्चांक गाठणार

औद्योगिक वापरासाठी व घाऊक खरेदीदारांसाठी डिझेलच्या किमती प्रति लिटर २५ रुपये वाढ झाल्याने उत्पादक कंपन्यांचा इंधनावरील खर्च वाढल्याने उत्पादन खर्च वाढणार आहे. शिवाय वाहतूक खर्च वाढल्यामुळे भाववाढीला आयते निमंत्रण मिळणार आहे. गेल्या आठवडय़ात विमानाच्या इंधनाच्या दरात देखील १८ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे.