मुंबई : रिझव्‍‌र्ह बँकेने सप्टेंबरअखेर रेपो दरात अर्ध्या टक्क्यांची वाढ केल्यांनतर, बँका आणि वित्तसंस्थांनी कर्जावरील व्याजदर वाढविण्यासह, ठेवींवर वाढीव लाभ देण्यास सुरुवात केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील कॅनरा बँकेने गुरुवारी सायंकाळी ‘एमसीएलआर’ आणि ‘रेपो दरा’सारख्या बाह्य मानदंडावर आधारित कर्जे महाग करत ठेवींवरील दरात देखील वाढ करण्याची घोषणा केली. यामुळे नवीन तसेच विद्यमान अशा दोन्ही प्रकारच्या कर्जदारांना याचा फटका बसणार आहे, तर ठेवीदारांना जास्त परतावा मिळविता येणार आहे.

कॅनरा बँकेने ‘एमसीएलआर’संलग्न व्याजदर वाढवून ७.९० टक्क्यांवर नेला आहे. सर्वसाधारणपणे ‘एमसीएलआर’चे दर एक ते तीन वर्षांसाठी निश्चित करण्यात आलेले असतात. कॅनरा बँकेने १ महिना मुदतीचा कर्ज दर ६.९० टक्क्यांवरून ७.०५ टक्के केला आहे. तीन महिन्यांसाठी कर्ज दर ७.२५ टक्क्यावरून ७.४० टक्के आणि सहा महिने मुदतीसाठी कर्जदर ०.१५ टक्क्याने वाढवून ७.८० टक्क्यांवर नेला आहे. तर एक वर्ष मुदतीचा दर ७.९० टक्क्यांवर नेला आहे. तसेच कर्जासाठी रेपो दराशी संलग्न व्याजदरात थेट अर्ध्या टक्क्याची वाढ बँकेने केली असून तो आता ८.५० टक्के करण्यात आला आहे. नवीन दर ७ ऑक्टोबरपासून लागू करण्यात आले आहेत.

ठेवीदारांना दिलासा

बँकेने दोन कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या ठेवींवरील व्याजदरात वाढीची घोषणा केली आहे. बँकेच्या ७ दिवस ते १० वर्षे मुदतीच्या ठेवींवर आता ३.२५ टक्के ते ७ टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल. तसेच ज्येष्ठ नागरिकांना विविध कालावधीच्या ठेवींवर ३.२५ टक्के ते ७.५० टक्क्यांपर्यंत व्याज मिळेल.