वधारत्या डिजिटल देयक व्यवहारांचे भारवाही मात्र चिनी स्मार्टफोन!

‘फोनपे पल्स’ अहवालानुसार, जुलै-सप्टेंबर २०२१ तिमाहीत भारतातील डिजिटल देयक व्यवहारांत लक्षणीय वाढ दिसून आली. या तिमाहीत प्रक्रिया झालेल्या डिजिटल व्यवहारातील देयकांचे एकूण मूल्य आधीच्या तिमाहीच्या तुलनेत २३.३ टक्क्यांनी वाढून ९,२१,६७४ कोटी रुपयांवर गेले. एकूण उलाढालींचे प्रमाणही तिमाहीगणिक ३३.६ टक्क्यांनी वाढून ५२६.५ कोटी उलाढालींपर्यंत वाढले आहे.

‘फोनपे’च्या जुलै-सप्टेंबर तिमाही अहवालाचा निष्कर्ष

मुंबई : भारतात वेगाने फोफावत असलेल्या डिजिटल उलाढालींसाठी वापरल्या जाणाऱ्या अव्वल पाचपैकी चार स्मार्टफोनच्या मुळाशी चिनी कंपन्या असून, सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत झालेल्या डिजिटल व्यवहारांमध्ये तब्बल ४५ टक्के व्यवहार हे शाओमी आणि विवो या दोन फोनच्या वापरातून पार पडले आहेत.

वॉलमार्टचे पाठबळ असलेल्या ‘फोनपे’ या ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस – यूपीआय’ व्यवहारांसाठी सर्वाधिक वापरात येणाऱ्या मोबाइल उपयोजनाच्या (अ‍ॅप) तिमाही ‘पल्स’ अहवालाने हे निष्कर्ष नोंदविले आहेत. फोनपेचे तब्बल ३.२८ कोटी नोंदणीकृत वापरकर्ते असून, देशभरातील ७२६ जिल्ह्यांपैकी ७२० जिल्ह्यांमधील ग्राहकांकडून होणाऱ्या जवळपास ४५ टक्के यूपीआय व्यवहारांची प्रक्रिया फोनपे अ‍ॅपद्वारे केली जाते.

शाओमीचा फोन वापरणारे ८ कोटी ग्राहक हे फोनपे अ‍ॅपचा वापर करत आहेत, तर विवो फोनधारकांमध्ये हे प्रमाण ६.५ कोटी इतके असल्याचे, त्या खालोखाल दक्षिण कोरियाच्या सॅमसंग फोनच्या वापरकर्ते येतात आणि त्यांची संख्या ६.१० कोटी इतकी आहे, असे फोनपे अ‍ॅपद्वारे प्रसिद्ध माहिती सांगते. चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील ओप्पो आणि रिअलमी फोनच्या वापरकर्त्यांचे प्रमाण अनुक्रमे ४.२ कोटी आणि २.४ कोटी असे आहे. या अव्वल पाचांपैकी सॅमसंग वगळल्यास अन्य सर्व फोनच्या नाममुद्रांचे मूळ चिनी आहे.

‘फोनपे पल्स’ अहवालानुसार, जुलै-सप्टेंबर २०२१ तिमाहीत भारतातील डिजिटल देयक व्यवहारांत लक्षणीय वाढ दिसून आली. या तिमाहीत प्रक्रिया झालेल्या डिजिटल व्यवहारातील देयकांचे एकूण मूल्य आधीच्या तिमाहीच्या तुलनेत २३.३ टक्क्यांनी वाढून ९,२१,६७४ कोटी रुपयांवर गेले. एकूण उलाढालींचे प्रमाणही तिमाहीगणिक ३३.६ टक्क्यांनी वाढून ५२६.५ कोटी उलाढालींपर्यंत वाढले आहे.

दुसरी लाट ओसरल्यानंतर, जास्त वेळेसाठी खुली झालेली दुकाने पाहता ऑनलाइन यूपीआय देयक व्यवहारांच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर तिमाहीत ऑफलाइन यूपीआय देयक व्यवहारांचे प्रमाण ६५ टक्क्यांनी वाढल्याचे अहवाल सांगतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Increasing digital payment transactions chinese smartphones phonepe akp

Next Story
‘कन्साइ नेरॉलॅक’ला सणांच्या हंगामात मागणीतील दुप्पट वाढ अपेक्षित
ताज्या बातम्या