मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्रची दुहेरी अंक वृद्धी

नवीन वित्त वर्षांच्या प्रारंभीच देशातील वाहन कंपन्यांनी विक्रीतील घसघशीत वाढ नोंदविली आहे. मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्रने दुहेरी अंकातील वृद्धी एप्रिल २०१८ मध्ये राखली आहे.

सलग १४ व्या महिन्यात विक्रीतील वाढ नोंदविताना मारुती सुझुकीने एप्रिलमध्ये वर्षभरातील सर्वोत्तम मासिक कामगिरी बजावली आहे.  मारुतीने गेल्या महिन्यात वार्षिक तुलनेत १४.४ टक्के अधिक वाहने विकली असून ती संख्या १.७३ लाखांवर गेली आहे.

कंपनीने वर्षभरापूर्वी याच कालावधीत १.५१ लाख वाहने विकली होती. तर यंदा मारुती सुझुकीची देशांतर्गत विक्री १.६४ लाख झाली असून त्यातील वाढही १४ टक्क्यांहून अधिक आहे, तर निर्यात यंदा १९.१ टक्के राहिली आहे.

मारुतीची स्पर्धक असलेल्या ह्य़ुंदाई मोटरच्या विक्रीत यंदा अवघ्या ६ टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा ती ५९,७४४ झाली आहे. तर देशांतर्गत विक्रीत फक्त ४.४ टक्के वाढ झाली आहे. कंपनीची निर्यात मात्र १२ टक्क्यांनी वाढली आहे.

टाटा समूहातील टाटा मोटर्सने यंदा दमदार विक्री कामगिरी बजाविली आहे. कंपनीच्या वाहनांची विक्री एप्रिल २०१८ मध्ये तब्बल ८६ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. व्यापारी तसेच प्रवासी वाहनांच्या जोरावर कंपनीची गेल्या महिन्यात एकूण विक्री ५३,५११ झाली आहे. तर टाटा मोटर्सची देशांतर्गत वाहन विक्री थेट १२६ टक्क्यांनी झेपावत ३६,२७६ झाली आहे. प्रवासी वाहने ३४ टक्क्यांनी वाढून १७,२३५ पर्यंत पोहोचली आहेत. तर निर्यात ४१ टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीच्या टिआगो, टिगोर, नेक्सॉन, हेक्सा या सर्वच वाहनांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे मानले जात आहे.

टाटा मोटर्सची कट्टर स्पर्धक महिंद्र अँड महिंद्रच्या वाहन विक्री गेल्या महिन्यात २२ टक्के वाढ नोंदली असून कंपनीची विक्री एप्रिलमध्ये ४८,०९७ झाली आहे. तर देशांतर्गत वाहन विक्री १९.३४ टक्क्यांनी विस्तारत ४५,२१७ पर्यंत गेली आहे. कंपनीची निर्यातही उल्लेखनीय, ८८.४८ टक्क्यांपर्यंत झेपावली आहे. महिंद्र समूहाची प्रवासी वाहन विक्रीतील कामगिरी १३ टक्क्यांनी तर व्यापारी वाहन विक्री २६ टक्क्यांनी वाढली आहे.

व्यापारी वाहन गटात टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्रबरोबर स्पर्धा निर्माण करणाऱ्या व्हीई कमर्शिअलच्या वाहन विक्रीत यंदा २८ टक्के वाढ झाली आहे. व्होल्व्होसह भागीदारीत आयशर नाममुद्रेंतर्गत विविध व्यापारी वाहने तयार करणाऱ्या या कंपनीने गेल्या महिन्यात ३,९५९ वाहने विकली आहेत.

अल्टो, व्हॅगन आर, सियाजला विक्रीत घसरणीचा फटका

कंपनीच्या अल्टो, व्हॅगनआर यासारख्या लहान गटातील प्रवासी वाहनांना तसेच मध्यम गटातील सेदान श्रेणीतील सिआजला मात्र घसरणीला सामोरे जावे लागले आहे. एकेकाळी सामान्यांची पसंतीची कार म्हणून लोकप्रिय असलेल्या अल्टो तसेच व्हॅगनआरसारख्या वाहनांची विक्री २.८ टक्क्यांनी कमी होत ती ३७,७९४ झाली आहे. तर स्विफ्ट, इस्टिलो, डिझायर तसेच बलेनोसारख्या कॉम्पॅक्ट गटातील वाहनांना ३१.८ टक्के अधिक प्रतिसाद लाभला आहे. या गटातील वाहने वर्षभरापूर्वीच्या ६३,५८४ वरून यंदा ८३,८३४ पर्यंत विकली गेली आहेत. जिप्सी, ग्रँड व्हिटारा, एर्टिगा, एस-क्रॉस तसेच व्हिटारा ब्रेझामध्ये नाममात्र वाढ झाली आहे. ओम्नी, इको या व्हॅन १४ टक्क्यांपर्यंत वाढली आहेत.