वर्षभरापूर्वी तसेच महिन्यापूर्वी शून्यात राहिलेल्या देशातील औद्योगिक उत्पादनाने सप्टेंबरमध्ये किरकोळ का होईना वाढ नोंदविली आहे. ऊर्जा तसेच खनिकर्म क्षेत्रातील वाढीने दोन महिन्यांपूर्वी उत्पादनाचा दर २ टक्के राहिला आहे.
ऑगस्ट २०१३ मध्ये औद्योगिक उत्पादन ०.४३ टक्के होते, तर वर्षभरापूर्वी सप्टेंबर २०१२ मध्ये हा दर ०.७ टक्के होता. एप्रिल ते सप्टेंबर या चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अर्धआर्थिक वर्षांतही हा दर ०.४ टक्के राहिला आहे. एप्रिलमधील १.५ टक्के वाढीनंतर सलग दोन महिने तो उणे स्थितीत नोंदला गेला. जुलैमध्येही हा दर २.८ टक्के होता.
सप्टेंबरमध्ये खनिकर्म क्षेत्रातील वाढ वर्षभराच्या २.२ टक्क्यांच्या तुलनेत ३.३ टक्के राहिली आहे; तर ऊर्जा क्षेत्राची वाढ वर्षभरापूर्वीच्या ३.९ टक्क्यांवरून थेट १२.९ टक्के नोंदली गेली आहे. सप्टेंबरमध्ये निर्मिती क्षेत्राची वाढही उणे १.६%  स्थितीतून वर येत ०.६ टक्के राहिली आहे. एकूण औद्योगिक उत्पादन निर्देशांकात निर्मिती क्षेत्राचा हिस्सा तब्बल ७५ टक्के असतो.
एप्रिल ते सप्टेंबरदरम्यान ऊर्जा क्षेत्राची वाढ ५.९ टक्के राहिली; तर याच कालावधीत खनिकर्म क्षेत्राची वाढ उणे १.१ टक्क्यांवरून उणे २.५ टक्क्यांपर्यंत घसरली आहे.