देशाच्या अर्थगतीत सुधाराच्या साऱ्या आशा धुळीला मिळवीत, शुक्रवारी सायंकाळी जाहीर झालेल्या नोव्हेंबर महिन्याच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने पुन्हा घसरणीचा राग आळविला. ऑक्टोबर २०१३ मधील १.५७ टक्क्य़ांच्या घसरणीनंतर सलग दुसऱ्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये देशातील कारखान्यातील उत्पादनाच्या गतीला २.१ टक्क्य़ांनी उतार आल्याचे ताजी आकडेवारी दर्शविते.
नोव्हेंबर २०१३ चे निराशाजनक आकडे हे प्रामुख्याने निर्माण क्षेत्राची खराब कामगिरी आणि उल्लेखनीय म्हणजे महागडय़ा ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनातील घटीला अधोरेखित करणारे आहेत.
औद्योगिक उत्पादन निर्देशांकात निर्माण क्षेत्र अर्थात कारखानदारीचा हिस्सा ७५ टक्के असा सर्वाधिक असून, नोव्हेंबरमध्ये या क्षेत्राचा वाढीचा दर कमालीचा म्हणजे ३.५ टक्के घसरला जो २०१२च्या नोव्हेंबरमध्ये ०.८ टक्के दराने वाढला होता. निर्देशांकात सामील प्रमुख २२ पैकी १० उद्योगगटांमध्ये घसरणकळा नोव्हेंबरमध्ये सुरूच राहिल्याचे आकडेवारीवरून दिसते. रेडिओ, टीव्ही, दूरसंचार उपकरणे निर्मितीच्या उद्योगात सर्वाधिक -४२.२ टक्क्य़ांची तर त्या खालोखाल कार्यालयीन, लेखा व संगणकीय सामग्रीच्या निर्मिती क्षेत्रात -२७.५ टक्क्य़ांची घसरण दिसली. फर्निचर निर्मिती क्षेत्रात १९.५ टक्क्य़ांची घसरण दिसून आली.
औद्योगिक उत्पादन दराचा यापूर्वीचा नीचांक हा मे २०१३ मध्ये उणे (-) २.५ नोंदविण्यात आला होता, नोव्हेंबरचे ताजे आकडे हे त्या नीचांकाच्याच जवळपास आहेत.
एप्रिल ते नोव्हेंबर असा आठ महिन्यांचा एकत्रित विचार केल्यास, औद्योगिक उत्पादनाचा दर हा उणे ०.२ टक्के असा आहे, जो २०१२ सालातील याच आठ महिन्यांमध्ये ०.९ टक्के असा माफक वाढीचाच पण सकारात्मक होता. एप्रिल ते नोव्हेंबर कालावधीत निर्माण क्षेत्राचा वाढीचा दर उणे ०.६ टक्के असा आहे जो २०१२च्या एप्रिल-नोव्हेंबर दरम्यान ०.९ टक्के दराने वाढला
होता.