कोलकाता : देशाने आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी विक्रमी ५०० अब्ज डॉलर मूल्याच्या वस्तू आणि सेवा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. महामारीच्या संकटाने जागतिक व्यापार नकाशाची नव्याने झालेली मांडणीत भारताला अनेक संधी खुणावत आहेत, असे आश्वासक प्रतिपादन परकीय व्यापार महासंचालनालयातील अतिरिक्त महासंचालक अमिया चंद्रा यांनी शुक्रवारी केले. 

देशाने डिसेंबर २०२१ मध्ये, मासिक ३७.८ अब्ज डॉलरची निर्यात व्यापार केला, जी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. गत वर्षांच्या तुलनेत सरलेल्या डिसेंबर (२०२१) महिन्यातील निर्यातीत ३७ टक्क्यांनी वाढ झाली. डिसेंबपर्यंत नऊ महिन्यांत देशाच्या निर्यातीने ३०१.३८ अब्ज डॉलरचा टप्पा गाठला असून, केंद्र सरकारने संपूर्ण आर्थिक वर्षांसाठी ४०० अब्ज डॉलर निर्यातीचे उद्दिष्ट ठेवले आहे. अमिया चंद्रा यांच्या मते प्रत्यक्षात ५०० अब्ज डॉलरपुढे निर्यात कामगिरी दिसू शकेल. नंतरच्या चार वर्षांत म्हणजे आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी दुपटीहून अधिक म्हणजे १ लाख कोटी डॉलर निर्यातीचे लक्ष्य देशाने ठेवले आहे.

करोनाच्या साथीने जागतिक पातळीवरील विकसित देशांच्या अर्थव्यवस्थांवरही विपरीत परिणाम साधला आहे. मात्र त्या परिणामी विदेशी व्यापारात मोठी घसरण होईल अशी निदान भारतासाठी तरी भीती राहिलेली नाही. तर या काळाने देशाला आत्मनिर्भर बनण्याची संधी मिळवून दिली. त्याचप्रमाणे जग बहुपक्षीय व्यापार करारांपासून फारकत घेत द्विपक्षीय करारांकडे वळत आहे. भारत सध्या सहा देशांबरोबर मुक्त व्यापार करार करण्याच्या मार्गावर आहे, अशी माहिती चंद्रा यांनी दिली. 

जागतिक व्यापारात कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) आणि इतर तंत्रज्ञानाशी संबधित बाबी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. याचबरोबर सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) लवकरच एक स्वतंत्र संकेतस्थळ सुरू केले जाणार असल्याची माहिती चंद्रा यांनी दिली.