मेमधील प्रतिसाद नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर

नवी दिल्ली : करोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रवास आणि माल हाताळणीवर निर्बंध लादल्याने गतिशीलता खंडित झाली असून परिणामी मेमधील इंधन मागणी नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे.

केंद्रीय तेल व वायू मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन व विश्लेषण कक्ष (पीपीएसी) च्या आकडेवारीनुसार, मे २०२० च्या तुलनेत इंधनाची मागणी यंदा १.५० टक्क्य़ांनी घसरून १५.०१ दशलक्ष टनवर गेली असून जी एप्रिलच्या तुलनेत ११.३ टक्कय़ांनी कमी आहे.

गेल्या वर्षी मेमध्ये भारतात कठोर निर्बंध असल्याने अर्थचक्र ठप्प झाले होते. यावर्षी, संसर्ग दर अधिक असला तरी मागील वर्षीच्या तुलनेत  निर्बंध काही प्रमाणात शिथिल आहेत. मागील वर्षांप्रमाणे वैयक्तिक प्रवासावर बंधने नाहीत. मागील मेच्या तुलनेत यंदा अधिक कारखाने सुरू आहेत. गतवर्षीच्या तुलनेत मेमध्ये  १.९९ दशलक्ष टन पेट्रोलचा खप मागील मेच्या तुलनेत १२ टक्कय़ांनी वाढला असला तरी एप्रिल २०२१ च्या तुलनेत १६ टक्क्य़ांनी आणि करोनापूर्व पातळीच्या २७ टक्क्य़ांनी घसरला आहे. डिझेलची विक्री ५.५३ दशलक्ष टन होती. डिझेलच्या वार्षिक विक्रीत किरकोळ, ५.५३ टक्के वाढ नोंदली गेली आहे. एप्रिलच्या तुलनेत खप १७ टक्क्य़ांनी कमी असून करोनापूर्व विक्री पातळीत २९ टक्के घसरण झाली आहे. प्रवासी निर्बंधामुळे हवाई इंधनाचा वापर ३६ टक्क्य़ांनी कमी झाला आहे. मेमध्ये हवाई इंधनाची मागणी २.६३ लाख टन नोंदली असून मागील मेमधील मागणीच्या जवळपास दुप्पट असली तरी करोनापूर्व पातळी ६.८० लाख टन होती. मागील महिन्याच्या तुलनेत देशातील स्वयंपाकाच्या गॅसची मागणी करोनापूर्व मागणीत ५.५ टक्के घट झाल्याचे समोर आले आहे. करोनाच्या पार्श्वभूमिवर अनुदानाचा भाग म्हणून दारिद्र रेषेखालील ग्राहकांना सरकारने विनामूल्य सिलिंडर दिले.