नवी दिल्ली : जागतिक पातळीवर विशेषत: अमेरिकी मध्यवर्ती बँक – फेडरल रिझव्‍‌र्हकडून होणारी आक्रमक व्याज दरवाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारात वस्तूंच्या उच्च किमतींमुळे निर्माण झालेल्या जोखमीचा सामना करण्यासाठी भारताकडे पुरेशी परकीय चलन गंगाजळी आहे, असा विश्वास जागतिक पतमानांकन संस्था ‘फिच रेटिंग्ज’ने बुधवारी व्यक्त केला.

बाह्य संकटांची भारतीय अर्थव्यवस्थेला झळ पोहोचली आहे. मात्र आगामी काळात परकीय चलनसाठा पुरेसा राहून भारताची चालू खात्यातील तूटदेखील मर्यादित पातळीवर असेल, असे ‘फिच रेटिंग्ज’ने निवेदनात म्हटले आहे. जून २०२२ मध्ये या पतमानांकन संस्थेने भारताच्या पतमानांकनासंबंधी नकारात्मक दृष्टिकोन बदलून तो ‘स्थिर’ असा सुधारण्यासह ‘बीबीबी- (उणे)’ पातळीवर आणला. भारताचे बाह्य वित्तपुरवठय़ावर अवलंबित्व मर्यादित असल्याने सार्वभौम पतमानांकनासाठी धोका कमी असल्याचे तिने नमूद केले आहे.

भारताची परकीय गंगाजळी जानेवारी-सप्टेंबर २०२२ या कालावधीमध्ये सुमारे १०१ अब्ज डॉलरने कमी झाली आहे. मात्र तरी देशाकडील परकीचा चलनसाठा ५३३ अब्ज डॉलरवर कायम आहे. चालू खात्यातील वाढती तूट आणि डॉलरच्या तुलनेत घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी रिझव्‍‌र्ह बँकेने परकीय चलन विनिमय मंचावर डॉलरची विक्री करून वेळोवेळी हस्तक्षेप केला आहे. देशाकडे ८ ते ९ महिने आयात समतुल्य परकीय चलन गंगाजळी उपलब्ध आहे. याआधी २०१३ मध्ये गंगाजळी केवळ ६.५ महिने आयात समतुल्य पातळीपर्यंत घसरली होती.

आयात खर्च वाढला मार्च २०२३ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षांत भारताची चालू खात्यावरील तूट सकल राष्ट्रीय उत्पादनाच्या (जीडीपी) ३.४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे, जी त्याआधीच्या आर्थिक वर्षांत १.२ टक्के राहिली होती. देशांतर्गत मागणीत झालेली वाढ, खनिज तेल आणि कोळशाच्या उच्च किमतीमुळे आयात महागल्याने एकूण आयात खर्च वाढला आहे.