इंडिया इन्फोलाइनची गृहवित्त क्षेत्रातील कंपनी ‘इंडिया इन्फोलाइन हाऊसिंग फायनान्स लि.’ने ११.५२% व्याज परताव्याच्या सुरक्षित, विमोचनयोग्य अपरिवर्तनीय रोख्यांची (एनसीडी) खुली विक्री करून ५०० कोटी रुपये उभारणे प्रस्तावित केले आहे. ही रोखे विक्री १२ डिसेंबरपासून सुरू होत आहे. कंपनीने प्रारंभिक प्रस्ताव २५० कोटी रुपयांच्या रोखे विक्रीसाठी पुढे आणला असून, प्रतिसाद लाभल्यास आणखी २५० कोटी रुपयांची रोखे विक्री करण्याचा पर्याय कंपनीला प्रदान करण्यात आला आहे. पाच वर्षे मुदतीच्या या रोख्यांतून मुदतपूर्ती अंती १२.१५ टक्केदसादशे दराने गुंतवणूकदार परतावा मिळवू शकतील. पतमानांकन संस्थांनी या रोखे विक्रीला ‘डबल ए मायनस’ असा पतदर्जा बहाल केला आहे. इंडिया इन्फोलाइनचे अध्यक्ष निर्मल जैन यांनी रोखे विक्रीविषयी बोलताना स्पष्ट केले की, गुंतवणूकदारांच्या विश्वासार्हतेची पावती म्हणजे इंडिया इन्फोलाइन समूहाकडून गेल्या तीन वर्षांत बाजारात खुली झालेली ही चौथी रोखे विक्री आहे आणि आजवर या नाममुद्रेला रोखे बाजारात अपेक्षेपेक्षा उमदा प्रतिसाद मिळत आला आहे.