नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांकडून रुपयात मोल मोजून रशियन तेलाची खरेदी करण्याची कोणतीही योजना नाही, असा खुलासा सोमवारी संसदेत सरकारकडून करण्यात आला.

भारताच्या एकूण तेल आयातीपैकी एक टक्क्याहून कमी तेलाची खरेदी रशियाकडून करतो. परंतु रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्याच्या परिणामी लादल्या गेलेल्या निर्बंधांमुळे तेल आणि वायू खरेदीसाठी रुपयाच्या व्यापारावर वाटाघाटी करण्याचा मार्ग पुढे आणला गेला आहे. यातूनच मग रशियाकडून तुलनेने स्वस्त तेल खरेदीच्या पर्यायावर सुरू झालेल्या चर्चेला सरकारने या खुलाशाद्वारे सोमवारी पूर्णविराम दिला.

सरकारी तेल कंपन्यांकडून अशा प्रकारचे कोणतेही करार मदार झालेले नाहीत अथवा रशिया किंवा इतर कोणत्याही देशाकडून भारतीय रुपयात मोबदला देऊन खनिज तेलाच्या खरेदीसाठी असा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत लेखी उत्तरादाखल स्पष्ट केले. मात्र या संबंधाने अन्य कोणतीही सविस्तर माहिती त्यांनी दिली नाही.

सरकारी मालकीच्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने दोन खेपांमध्ये रशियन तेल व्यापाऱ्यांमार्फत सवलतीच्या दरात तेल विकत घेतले आहे. कंपनीने प्रत्येक खेपेत ३० लाख पिंप तेल युरोपातील व्यापारी व्हिटोलमार्फत खरेदी केले. तर हिंदूस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशनने  एका व्यापाऱ्यामार्फत २० लाख पिंप रशियन तेल खरेदी केले आहे. रशियावरील निर्बंधांमुळे अनेक देशांनी तेथून तेल खरेदी बंद केली आहे. यामुळे रशियन तेल बाजारात सवलतीच्या दरात उपलब्ध होत आहे. विद्यमान आंतरराष्ट्रीय किमतीच्या तुलनेत प्रति पिंप २० ते २५ अमेरिकी डॉलरच्या सवलतीने रशियन तेल उपलब्ध होत आहे. या संधीचे सोने करण्यासाठी, भारतीय कंपन्यांनी निविदा काढल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. या निविदा मुख्यत: स्वस्त रशियन तेलाचा साठा केलेल्या व्यापाऱ्यांकडून पटकावल्या गेल्या आहेत.