मुंबई : देशात ग्राहकांचा आत्मविश्वास बळावत चालला असून, मौल्यवान धातू सोन्याच्या मागणीतील लक्षणीय वाढ हे प्रतिबिंबीत करते. सरलेल्या जुलै ते सप्टेंबर तिमाहीत सोने मागणी वर्षांगणिक ४७ टक्क्य़ांनी वाढून १३९ टनांवर म्हणजे करोनापूर्व पातळीवर पोहचल्याचे जागतिक सुवर्ण परिषदेकडून (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) गुरुवारी प्रसिद्ध अहवालाने स्पष्ट केले. 

ग्राहकांची सोन्याची मागणी वाढणे हे अर्थव्यवस्थेविषयी आश्वासकतेचे द्योतक आहे. मागणीने करोनापूर्वीचा स्तर सरलेल्या तिमाहीत गाठला असून, पुढील सणासुदीचा काळ पाहता, सोन्याची झळाळी आणखी वाढत जाताना दिसेल, असे कौन्सिलने म्हटले आहे.

संपूर्ण देश करोना टाळेबंदीखाली असताना जुलै-सप्टेंबर २०२० मध्ये सोन्याची भारतातील एकूण मागणी ९४.६ टन इतकी होती, त्या तुलनेत यंदा ती १३९.१ टनांवर गेली आहे. मूल्यानुसार मागणीतील ही वर्षांपूर्वीच्या ४३,१६० कोटी रुपयांवर, यंदाच्या तिमाहीत ५९,३३० कोटी रुपयांवर गेली आहे.

व्यापारातील सकारात्मक बदल आणि ग्राहकांच्या बळावलेल्या खरेदीच्या भावना यांच्या संयोगाचा हा परिणाम आहे. प्रामुख्याने लसीकरणाचे उंचावलेले प्रमाण आणि घसरलेला संसर्ग दर यामुळे तिसऱ्या लाटेबाबतची भीती बव्हंशी सरली आहे. यातून आर्थिक क्रियाकलापांमध्ये झालेली वाढ ही मागणीत वाढीच्या पथ्यावर पडली आहे, असे वर्ल्ड गोल्ड कौन्सिलचे प्रादेशिक मुख्य कार्यकारी, सोमसुंदर पी. आर. यांनी स्पष्ट केले.

चलनवाढ पथ्यावर

अनेक दशकांचा पूर्वइतिहास तपासल्यास, चलनवाढ ही सोन्यातील मागणीला उपकारक ठरत आली आहे. महागाईच्या झळांपासून बचावाचे सोने मजबूत साधन समजले जाते. त्यामुळे विद्यमान २०२१ सालाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या अंतिम तिमाहीत मौल्यवान धातूच्या मागणीत तीव्र वाढ दिसून आल्यास नवलाचे ठरणार नाही. किंबहुना सोने मागणीच्या दृष्टीने ती दशकातील सर्वोत्तम तिमाहींपैकी एक असेल, अशी पुस्ती सोमसुंदर यांनी जोडली.

सणोत्सवासह लग्नाचा हंगामही येत असल्याने सोन्याच्या मागणीतील उत्साह असाच कायम राहण्याचा आशावादी अंदाज आहे. उल्लेखनीय म्हणजे सरलेल्या तिमाहीत दागिने घडविण्यासाठी सोने आयात ६०.८ टनांवरून, ९६.२ टनांवर म्हणजे ५८ टक्क्य़ांनी वाढली आहे.

’  सोमसुंदर पी. आर., मुख्य कार्यकारी, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल