नवी दिल्ली : देशातील औद्योगिक क्षेत्राचे आरोग्यमान दर्शविणाऱ्या औद्योगिक उत्पादन दराने सरलेल्या मार्च २०२२ मध्ये १.९ टक्क्यांची वाढ दर्शविली. बिघडलेल्या बाह्य वातावरणामुळे सुटय़ा घटकांच्या किमतींनी आभाळ गाठले असतानाही, ही वाढ दिलासादायी मानली जात आहे.  

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (एनएसओ) गुरुवारी जारी केलेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांक आकडेवारीनुसार, मार्च २०२२ मध्ये औद्योगिक उत्पादन दरातील १.९ टक्क्यांची वाढ ही मुख्यत: वीज आणि खाण क्षेत्राच्या चांगल्या कामगिरीमुळेच शक्य झाली. मागील वर्षी म्हणजे मार्च २०२१ मध्ये औद्योगिक उत्पादन दरात २४.२ टक्क्यांची वाढ दिसून आली होती. अधिकृत आकडेवारीनुसार, निर्मिती क्षेत्रातून मार्चमध्ये अवघी ०.९ टक्क्यांची वाढ दिसून आली असली तरी खाण उत्पादन ४ टक्क्यांनी आणि वीजनिर्मिती क्षेत्रात ६.१ टक्क्यांची वाढ दिसून आली.  उल्लेखनीय म्हणजे २०२०-२१ या आर्थिक वर्षांतील औद्योगिक उत्पादन दरातील ८.४ टक्क्यांच्या आकुंचनाच्या तुलनेत, २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षांत हा दर ११.३ टक्क्यांनी वाढला आहे. मार्च २०२० पासून करोना विषाणूजन्य साथीच्या उद्रेकाचा औद्योगिक उत्पादनाला जबर फटका बसला होता, त्या महिन्यांत ते १८.७ टक्क्यांनी घसरले होते. पुढे करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लागू केलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक क्रियाकलापांना पायबंद बसल्याने एप्रिल २०२० मध्ये औद्योगिक उत्पादन दर ५७.३ टक्क्यांनी घसरले होते.