नवी दिल्ली : देशाच्या निर्मिती क्षेत्राने सरलेल्या जुलैमध्ये लक्षणीय सक्रियता नोंदवली असली तरी दुसरीकडे सेवा क्षेत्राची कामगिरी चार महिन्यांच्या नीचांकपदी पोहचल्याचे जुलै महिन्यातील मासिक सर्वेक्षणात दिसून आले. स्पर्धात्मक दबाव, वाढलेली महागाई आणि प्रतिकूल हवामान यामुळे एकंदर मागणी कमी झाल्याचा परिणाम देशाच्या सेवा क्षेत्राची गती मंदावण्यात दिसून येत आहे.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया सव्‍‌र्हिसेस पीएमआय’ निर्देशांक जुलै महिन्यात ५५.५ गुणांवर नोंदवला गेला. जूनमधील ५९.२ गुणांच्या तुलनेत या निर्देशांकातील जवळपास ३.७ गुणांची झालेली पडझड ही सेवा क्षेत्रापुढील वर्तमान परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे दर्शविणारी आहे. मात्र सलग बाराव्या महिन्यात सेवा क्षेत्रातील उत्पादनात वाढ झाली आहे.

भारताच्या निर्मिती क्षेत्रासंबंधी मंगळवारी जाहीर झालेल्या पीएमआय निर्देशांक ५६.४ असा आठ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर नोंदला गेला आहे. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५०च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते.

सर्वेक्षणानुसार, जुलैमध्ये जास्त विक्री नोंदवणाऱ्या सेवा प्रदात्यांसाठी अनुकूल मागणीची परिस्थिती होती. मात्र, तीव्र स्पर्धा आणि प्रतिकूल हवामान आणि सेवा क्षेत्रातील वाढलेल्या महागाईमुळे या क्षेत्राची गती कमी झाली आहे. उत्पादन आणि विक्री दोन्ही वाढले असले तरी ते चार महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचले आहे, असे निरीक्षण ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया’च्या अर्थतज्ज्ञ पॉलियाना डी लिमा यांनी बुधवारी नोंदविले.

देशांतर्गत आघाडीवर सेवांसाठी चांगली मागणी राहिली आहे. मात्र भारतीय सेवांसाठी जागतिक मागणी कमी झाली आहे. भारतीय कंपन्यांच्या सेवांना परदेशातून मिळणाऱ्या मागणीमध्ये प्रत्येक महिन्यात घट होत आली आहे. सेवा क्षेत्रातील व्यावसायिकांचा आत्मविश्वास जुलैमध्ये कमी झाला आहे.

कारण केवळ ५ टक्के कंपन्यांनी पुढील वर्षांत उत्पादन वाढीचा अंदाज वर्तवला आहे, तर बहुसंख्य कंपन्यांनी (९४ टक्के) सध्याच्या पातळीपासून सेवा-उत्पादनात कोणताही बदल होणार नाही असा अंदाज व्यक्त केल्याचे ‘एस अ‍ॅण्ड पी ग्लोबल इंडिया’च्या अहवालाने नमूद केले आहे.

महागाई अपायकारक

किमतीच्या आघाडीवर, सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी जुलैमध्ये त्यांच्या सरासरी खर्चात आणखी वाढ अनुभवली, ज्यात अन्न, इंधन, कार्यालयीन साहित्य, कर्मचारी वेतन खर्च, किरकोळ खर्च आणि वाहतूक हे महागाईच्या अंगाने दबाव आणणारे प्रमुख स्रोत नमूद करण्यात आले. यामुळे सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या खर्चात वेगाने वाढ झाल्याचे दिसत असले तरी वाढीचे प्रमाणही पाच महिन्यांतील सर्वात कमी आहे. परिणामी, नफा टिकवून ठेवण्यासाठी धडपडणाऱ्या सेवा कंपन्यांना किंचित दिलासा मिळाला आहे.