नवी दिल्ली :देशाच्या सेवा क्षेत्राने मरगळ झटकून सरलेल्या ऑक्टोबर महिन्यात लक्षणीय सक्रियता दाखविल्याचे गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या मासिक सर्वेक्षणातून पुढे आले. सप्टेंबर महिन्यात सहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर पोहोचलेल्या सेवा क्षेत्राने ऑक्टोबरमध्ये वेग पकडला आहे.

भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शविणाऱ्या ‘एस अँड पी ग्लोबल पीएमआय’ निर्देशांक ऑक्टोबरमध्ये ५५.१ नोंदला गेला आहे. सप्टेंबर महिन्यातील सेवा क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक सहा महिन्यांतील नीचांकी पातळीवर म्हणजेच ५४.३ असा नोंदला गेला होता. पीएमआय निर्देशांक ५० गुणांच्या वर राहिल्यास अर्थव्यवहारातील विस्तार दर्शविला जातो, तर ५० च्या खाली गुणांक आकुंचनाचे निदर्शक मानले जाते. हा निर्देशांक सेवा क्षेत्रासाठी सलग १५ व्या महिन्यात तो ५० गुणांहून अधिक राहिला आहे.

आर्थिक वर्षांतील तिसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला सेवांसाठी मागणी कायम असून, नवीन व्यवसाय आणि उत्पादनात वाढीला सुरुवात झाली आहे. याचबरोबर, विस्ताराचा वेग सप्टेंबरच्या सहा महिन्यांच्या नीचांकी स्तरावरून झपाटय़ाने वाढला आहे. नवीन कामाच्या आलेल्या ओघामुळे सेवा प्रदात्यांमध्ये उत्साही वातावरण आहे. यामुळे व्यावसायिक आत्मविश्वासात वाढला असून रोजगाराच्या आघाडीवर ऑक्टोबर महिन्यात आशादायी चित्र आहे, असे निरीक्षण एस अँड पी ग्लोबल मार्केटच्या अर्थतज्ज्ञ पॉलिआना डी लिमा यांनी नोंदविले.

सर्वेक्षणानुसार, ऑक्टोबरमध्ये स्थानिक भारतीय बाजारपेठेतील म्हणजेच देशांतर्गत मागणी ही सेवा क्षेत्रासाठी कंपन्यांसाठी मुख्य चालना होती, तर परदेशातील मागणीत घसरण नोंदवण्यात आली. सेवा कंपन्यांना सर्वाधिक ग्राहक वित्त आणि विमा क्षेत्राकडून प्राप्त झाले.