केंद्रीय अर्थसंकल्प आणि जागतिक घडामाोडी अशा देशीविदेशीच्या लाटेत चार दिवस गटांगळ्या खाणाऱ्या शेअर बाजारात बुधवारी तेजी आली. बुधवारी सेन्सेक्स २३८ अंशानी तर निफ्टी ८९.५० अंशांनी वधारला आहे.

गेल्या आठवड्यात केंद्रीय अर्थसंकल्पात समभागावरील दीर्घकालीन भांडवली लाभावर १० टक्के कर लावण्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच अमेरिकेतील घडामोडींचे परिणामही शेअर बाजारवर झाले. फेडरल रिझर्व्हने स्थिर व्याजदराचे पतधोरण जाहीर केल्यानंतर रोख्यांवरील व्याजाचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली. यामुळे कर्ज उभारणी महाग ठरण्याची भीती व्यक्त करत अमेरिकेतील शेअर बाजारात पडझड झाली होती. या दोन्ही घडामोडींचा फटका भारतातील शेअर बाजारावर बसला. गुंतवणूकदारांचे तब्बल १० लाख कोटी रुपये मातीमोल झाले होते.

बुधवारी सकाळी शेअर बाजार सावरल्याचे दिसून आले. सेन्सेक्स २३८. ४१ अंशांनी वधारुन ३४, ४३४ वर स्थिरावला. तर ‘निफ्टी’ही ८९. ५० अंशांनी वाढून १०, ५८७ पर्यंत पोहोचला. बुधवारी रिझर्व्ह बँकेचे सहावे द्विमासिक पतधोरण जाहीर होणार असून या पतधोरणावर शेअर बाजाराचा आजचा प्रवास ठरणार आहे. डिसेंबर २०१७ अकेर ५ टक्क्यांपुढील महागाई दर व अर्थसंकल्पीय तरतुदींच्या पार्श्वभूमीवर व्याजदरात कपात होण्याची शक्यता कमीच आहे.