विकास : यंदाचा कमीच?

चालू आर्थिक वर्षांत देशाचा विकास दर ५ टक्क्यांच्या आतच विसावण्याचे अंदाज व्यक्त होत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी सरकार ४.९ टक्के विकास दर या कालावधीत गाठेल,

चालू आर्थिक वर्षांत देशाचा विकास दर ५ टक्क्यांच्या आतच विसावण्याचे अंदाज व्यक्त होत आहे. पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष सी. रंगराजन यांनी सरकार ४.९ टक्के विकास दर या कालावधीत गाठेल, असा विश्वास व्यक्त करतानाच शेवटच्या तिमाहीतील अर्थ प्रगती ५.५ टक्के असेल, असे म्हटले आहे. तर फिच या पतमानांकन संस्थेने हा दर नियोजित ४.९ टक्क्यांपेक्षाही कमी, ४.७ टक्के असेल, अशी भीती व्यक्त केली आहे.
२०१३-१४ संपण्यास पंधरवडा शिल्लक असताना या कालावधीसाठी केंद्र सरकारने ४.९ टक्के विकास दराचे लक्ष्य राखले आहे. केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांच्यासह केंद्रीय सांख्यिकी कार्यालयानेही याच आकडय़ांवर शिक्कामोर्तब केले आहे. ‘भारतीय औद्योगिक महासंघा’च्या (सीआयआय) व्यासपीठावरून रिझव्‍‌र्ह बँकेचेही माजी गव्हर्नर राहिलेल्या सी. रंगराजन यांनी शुक्रवारी यंदा ४.९ टक्के विकास दर गाठला जाईल, असा विश्वास व्यक्त केला.
रंगराजन यांनी जानेवारी ते मार्च या चालू आर्थिक वर्षांच्या शेवटच्या तिमाहीतील दर तब्बल ५.५ टक्के असेल, असेही म्हटले आहे. यासाठी त्यांनी निर्मिती आणि कृषी क्षेत्राच्या वृद्धीचा आधार घेतला आहे. यापूर्वीच्या तिन्ही तिमाहीपेक्षा हा दर निश्चितच अधिक आशादायक असेल, असेही ते म्हणाले. या तिमाहीतील विशेषत: शेवटच्या दोन महिन्यात निर्मिती क्षेत्रात हालचाली वाढल्याचेही त्यांनी सांगितले. पुढील आर्थिक वर्षांचा त्यांचा अंदाज ५ ते ५.६ टक्के आहे.
‘फिच रेटिंग्ज’ने विद्यमान आर्थिक वर्षांत विकास दर ४.७ टक्के अभिप्रेत करतानाच तो येत्या दोन आर्थिक वर्षांमध्ये उंचावले, असे म्हटले आहे. २०१४-१५ मध्ये दर ५.५ व त्यापुढील आर्थिक वर्षांत तो ६ टक्के असेल, असे आपल्या जागतिक आर्थिक अंदाजामध्ये नमूद केले आहे. तिसऱ्या तिमाहीत देशाने ४.७ टक्के विकास दर राखला आहे. तर गेल्या आर्थिक वर्षांत भारताचा विकास दर ४.५ टक्के असा दशकातील सर्वात कमी राहिला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Indian economy 5 2 per cent growth in q4 achievable says c rangarajan