मुंबई : करोनामुळे गेल्या वर्षभरापासून मंदीच्या सावटाखाली असणाऱ्या भारतीय रोजगार क्षेत्राच्या दृष्टीने दिलासादायी अहवाल पुढे आला आहे. आगामी २०२२ वर्षात भारतीयांच्या वेतनमानात ९.३ टक्क्यांची वाढ होण्याची आशा आहे.

जागतिक दलालीपेढी ‘विलिस टॉवर्स वॉटसन’ यांच्या ‘सॅलरी बजेट प्लॅनिंग’ या बुधवारी प्रसिद्ध झालेल्या अहवालाने आशिया पॅसिफिक परिसरातील देशांमध्ये २०२२ सालात होणाऱ्या वेतन श्रेणीतील बदलांवर टिप्पणी केली आहे. भारतात टाळेबंदीत शिथिलतेनंतर उद्योगांमध्ये नवा आशावाद निर्माण झाला असून, चांगली गुणवत्ता सामावून घेण्यासाठी कंपन्यांमधील चढाओढ पाहता, त्यांच्याकडून मोबदलाही वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. किंबहुना अहवालाच्या मते, आशियाई पॅसिफिक क्षेत्रात भारत हा सर्वाधिक पगारवाढ होणारा देश ठरेल.

‘विलिस टॉवर्स वॉटसन’च्या अहवालात मे आणि जून २०२१ मध्ये केलेल्या सर्वेक्षणात आशियाई पॅसिफिकमधील १३ बाजारपेठांचा व त्यातील १४०५ कंपन्यांचा अभ्यास करण्यात आला आहे. या सर्वेक्षणात ४३५ भारतीय कंपन्यांचा समावेश होता. येत्या १२ महिन्यांच्या काळात बहुतांश भारतातील कंपन्यांचे महसुली उत्पन्न चांगले राहण्याची शक्यता आहे. यामुळे सर्वच उद्योगांमध्ये नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होणार असून ३० टक्के कंपन्या वर्षभरात नवीन नोकरभरती करतील. तसेच २०२० च्या तुलनेत नवीन रोजगाराच्या संधीत तिपटींनी वाढ होण्याची आशा व्यक्त करण्यात आली आहे. 

नोकरीदायी रग्गड पगाराची क्षेत्रे…

करोनामुळे कंपन्यांमध्ये डिजिटल माध्यमातून कामकाजावरील भर वाढला आहे. यामुळे या क्षेत्रातील कौशल्य असलेल्या तरुणांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी पगाराच्या अंदाजपत्रकात वाढ केली आहे. याशिवाय अहवालात, अभियांत्रिकी (५७.५ टक्के), माहिती-तंत्रज्ञान (५३.४ टक्के), तांत्रिकदृष्ट्या कुशल क्षेत्र (३४.२ टक्के), विक्री (३७ टक्के) आणि वित्त (११.६ टक्के) अशा सर्वच क्षेत्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन रोजगार उपलब्ध होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. शिवाय या क्षेत्रातील नोकरदारांना अधिक चांगले वेतनमान मिळणार आहे.

नोकरी बदलण्याचा दर कमी

भारतात इतर देशांच्या तुलनेत स्वेच्छेने आणि सक्तीने नोकरी बदलण्याचा दर कमी आहे. स्वेच्छेने नोकरी बदलण्याचा दर ८.९ टक्के तर सक्तीने नोकरी बदलावी लागण्याचा दर ३.३ टक्क्यांवर आहे.