सरकारकडून भांडवलीकरणाचे सार्वजनिक बँकांप्रमाणे पाठबळ मिळणार नसतानाही खासगी क्षेत्रातील अग्रणी आयसीआयसीआय बँकेनेही स्पर्धात्मकतेच्या दबावातून व्याजदर कपातीचे स्पष्ट संकेत दिले. किंबहुना कर्ज स्वस्ताईच्या ताज्या प्रघाताचा पहिली नांदी आयसीआयसीआय बँकेकडून होईल अशी सकारात्मकता बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांनी ‘लोकसत्ता’बरोबर झालेल्या संवादात दाखविली.
आयसीआयसीआय बँकेच्या चंदा कोचर म्हणाल्या, ‘‘गेल्या महिन्यात रिझव्‍‌र्ह बँकेने पाव टक्का रेपो दर वाढविल्यानंतर आम्हीही कर्जावरील व्याजदर वाढविले. बरोबरीने अल्पमुदतींच्या ठेवींवर ज्यादा व्याज देऊ केले. सध्या अर्थव्यवस्थेत रोकड सुलभता आहे. ठेवींमध्ये भर पडली आहे. चांगल्या मान्सूनमुळे कृषी उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे पतपुरवठय़ात वाढीला अनुकूल वातावरणाने निर्माण केलेली संधी आपली बँक वाया दवडणार नाही.’’ सद्यस्थिती व्याजदर हे वाजवी आणि किमान आकर्षक पातळीवर यावेत अशीच असल्याचे त्यांनी पुस्तीही जोडली.
मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सणासुदीच्या दिवसांत वित्तपुरवठय़ासाठी निधीची अडचण येऊ नये यासाठी अर्थसंकल्पात तरतूद केलेली १४,००० कोटींची रक्कम सरकारी बँकांमध्ये अतिरिक्त भांडवल म्हणून तातडीने ओतण्याचा केंद्रीय अर्थमंत्रालयाने गुरुवारी घेतलेल्या निर्णयाने ऐन दसरा-दिवाळीच्या तोंडावर या बँकांकडून गृहकर्ज, वाहन कर्ज व अन्य ग्राहक कर्जाच्या व्याजाच्या दरात कपात केली जाण्याच्या शक्यतेला वाव निर्माण झाला आहे. इंडियन ओव्हरसीज बँकेने तसे स्पष्ट संकेतही दिले असून, सार्वजनिक क्षेत्रातील अन्य बँकांकडूनही तसे पाऊल टाकले जाऊ शकेल.
भांडवली पर्याप्ततेसाठी सरकारकडून पाठबळ लाभल्याने कर्जाची मागणीही वाढेल असे धोरण म्हणून इंडियन ओव्हरसीज बँकेकडून व्याजाच्या दरात पाव ते अर्धा टक्क्यांची कपात नजीकच्या काळात शक्य होईल, असे बँकेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक एम. नरेंद्र यांनी स्पष्ट केले.
इंडियन ओव्हरसीज बँकेकडून सध्याच्या घडीला ३० लाख रुपयांपर्यंतचे गृहकर्ज हे वार्षिक १०.२५ टक्के दराने, तर वाहन कर्जही १०.७५ टक्के असे तुलनेने कमी व्याजदरातच वितरित होत असल्याचे नरेंद्र यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले. सरकारकडून रु. २१०० कोटींचे अतिरिक्त भांडवल बँकेत येणे अपेक्षित आहे, ते आल्यास कर्ज वितरणात १४ टक्के वाढीचे लक्ष्य बँकेला गाठता येईल. पात्र संस्थागत गुंतवणूकदारांमार्फत (क्यूआयपी) अथवा हक्कभाग विक्रीतून भांडवल उभारणी करण्याचा पर्यायही बँकेपुढे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.