डॉलरच्या तुलनेत गेल्या १३ महिन्यांच्या नीचांकात गेलेला रुपया मंगळवारी सावरला. सलग पाच व्यवहारांत प्रथमच २९ पैशांनी उंचावताना स्थानिक चलन ६३.३८ वर पोहोचले. स्थानिक रोख्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी निधी ओतल्याने तसेच आयातदारांनी डॉलरची विक्री केल्याने रुपया भक्कम होऊ शकला. चलन व्यासपीठावर रुपयाची सुरुवात ६३.७२ अशी नरमाईनेच सुरू झाली. सत्रात चलन ६३.७९ पर्यंत घसरले. डॉलर विक्रीने रुपया व्यवहारात ६३.३५ पर्यंत झेपावला. गेल्या चार व्यवहारांत रुपया ४७ पैशांनी घसरला आहे.
कच्चे तेल पुन्हा पंचवार्षिक नीचांकाला
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा एकदा गेल्या पाच वर्षांच्या नीचांक पातळीवर आले आहेत. कच्च्या तेलाचे फेब्रुवारीमधील व्यवहार हे ६० डॉलर प्रतिपिंपाच्याही खाली नोंदले गेले आहेत. सिंगापूरच्या बाजारात सकाळच्या व्यवहारात कच्च्या तेलाचे व्यवहार ५७ डॉलर प्रतिपिंपने होत होते. २०१४ च्या मध्यान्हाला १४० डॉलरवरून वर्षअखेरीस निम्म्याच्याही खाली कच्च्या तेलाच्या दरांचा प्रवास आला आहे. काळ्या सोन्याची ही दरपातळी मे २००९ च्या समकक्ष पोहोचली आहे.