तांत्रिक विश्लेषणाच्या दृष्टिकोनातून पुढील आठवडय़ातील निर्देशांकांची आणि प्रमुख समभागांची संभाव्य वाटचाल..

पंधरवडय़ापूर्वीच्या शनिवार, २४ जूनच्या लेखाचे शीर्षक होते- ‘बाजाराच्या घातक उतारांनी आपण त्रस्त व्हावे काय?’ त्या लेखात, ‘गॅन कालमापन पद्धतीप्रमाणे (गॅन टाइम सायकल) ६ जुल २०१७ ही महत्त्वपूर्ण तारीख आणि त्या तारखेपाशीच निर्देशांकाचा संभाव्य उच्चांक होण्याची शक्यता आहे. तेव्हा तीन महिन्यांहून कमी कालावधी असलेल्या गुंतवणूकदारांनी (अत्यल्प मुदतीची गुंतवणूक धारणा) नफा पदरी बांधून घेणे श्रेयस्कर’ असे सुचविण्यात आले होते. तेव्हाच्या परिस्थितीला सध्यासारखा भारत-चीन सीमाप्रश्नाचा पैलू आणि युद्धज्वराचा लवलेशही नव्हता. पण आता आशिया खंडातील वाढत जाणाऱ्या युद्धज्वराच्या पाश्र्वभूमीवर पुढील आठवडय़ाचा किंबहुना संपूर्ण जुल महिन्याचा आढावा आज आपण घेऊ या.

शुक्रवारचा बंद भाव

सेन्सेक्स ३१,३६०.६३

निफ्टी     ९,६६५.८०

पुढील आठवडा कसा?

आजच्या घडीला निर्देशांकाला सेन्सेक्स ३१,१००/ निफ्टीला ९,६००चा भरभक्कम आधार आहे व निर्देशांकाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा (बॅण्ड) हा अनुक्रमे ३०,७०० ते ३१,५०० / ९,४५० ते ९,७०० आहे.

निर्देशांकांनी ३१,५०० / ९,७०० ला सकारात्मक वरचा छेद दिल्यास ३२,००० / ९,८०० ते ९,८५० हे वरचे इच्छित उद्दिष्ट असेल अन्यथा ३१,५०० / ९,७००च्या वर जाण्यास निर्देशांक वारंवार अपयशी ठरत असेल तर निर्देशांक ३०,८०० / ९,५०० पर्यंत खाली घसरू शकतो. युद्धज्वर आटोक्यात न आल्यास निर्देशांक ३०,५०० / ९,४०० आणि त्यानंतर २९,७०० / ९,२०० अशी निर्देशांकांची खालची इच्छित उद्दिष्टे असतील.

येथे अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांना नफारूपी विक्री करावयाचा सल्ला वारंवार दिला जातो. कारण हल्ली निर्देशांक स्थिर ठेवून चांगल्या प्रतीच्या समभागात (मिडकॅप) १५ ते २० टक्क्यांची घसरण अनुभवायला मिळते. १९ ते २४ मे या कालावधीत ते आपण अनुभवले आहे. हा मुद्दा स्पष्ट होण्यासाठी ६ मे रोजी या स्तंभात शिफारस केलेला गणेश हाऊसिंग (रु. ११७.२०) या समभागात १२५ रुपये ही ‘करनिर्धारण पातळी’ होती. या स्तरावर १५० रु. हे पहिले वरचे इच्छित उद्दिष्ट असेल, असे सांगितले गेले. जे ६ जुलला साध्य झाले. आता दोन महिन्यांत २० टक्के इतका परतावा मिळणे अत्यल्प मुदतीच्या गुंतवणूकदारांसाठी खूपच आकर्षक आहे. याचा सर्वात मोठा फायदा मुद्दल सुरक्षित राहून लाभ पदरात पडणे हा आहे. आताच्या युद्धजन्य परिस्थितीत याची नितांत गरज आहे.

लक्षवेधी समभाग..

आयडीएफसी बँक  लिमिटेड

शुक्रवारचा बंद भाव : रु. ६४.७०

समभाग दीर्घ मुदतीच्या मंदीच्या गत्रेतून बाहेर येत असतानाच या आठवडय़ातील उत्साहवर्धक बातम्यांनी समभागाच्या किमतीचे वरचे मार्गक्रमण सुरू झाले आहे. समभागाचा सामान्य मार्गक्रमण पट्टा हा ५४ ते ६८ रुपये आहे. ६८ रुपयांच्या वर पहिले इच्छित उद्दिष्ट ८० रुपये असेल आणि नंतर १०० रुपये ते १२५ रुपये असेल. या दीर्घमुदतीच्या गुंतवणुकीला ५४ रुपयांचा ‘स्टॉप लॉस’ ठेवावा.

(खुलासा : या समभागात २०१६ पासून लेखकाची दीर्घकालीन अत्यल्प गुंतवणूक आहे)