पीटीआय, नवी दिल्ली
खाणकाम तसेच वीजनिर्मिती क्षेत्राच्या उंचावलेल्या कामगिरीच्या जोरावर सरलेल्या एप्रिलमध्ये औद्योगिक उत्पादन दर ७.१ टक्क्यांची दमदार मजल मारली. देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जाणाऱ्या या निर्देशांकाने आठ महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर मजल मारली आहे. आधीच्या मार्च महिन्यात तो केवळ २.२ टक्के नोंदवला गेला होता.

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, निर्मिती क्षेत्राने २०२२-२३ आर्थिक वर्षांच्या पहिल्या महिन्यात ६.३ टक्के वाढ नोंदवली आहे. खाणकाम तसेच वीजनिर्मिती क्षेत्राने अनुक्रमे ७.८ आणि ११.८ टक्के दराने वाढ नोंदविली आहे. निर्मिती उद्योग, खाणकाम व वीजनिर्मिती क्षेत्रातील उत्पादनाने करोनापूर्व पदावर पोहोचल्याचा हा सुपरिणाम दिसून आला.

भांडवली वस्तू क्षेत्रात सर्वाधिक वाढ नोंदवण्यात आली आहे. ती सरलेल्या एप्रिल महिन्यात १४.७ टक्के राहिली आहे. त्याआधीच्या महिन्यात ती केवळ दोन टक्के नोंदविली गेली होती. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राच्या कामगिरीतदेखील भरीव सुधारणा होत ते मार्च महिन्यातील उणे २.६ टक्क्यांवरून विस्तारत ८.५ टक्के दराने वाढ झाली आहे. मात्र पायाभूत वस्तू क्षेत्राची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. ती मार्चमधील ६.७ टक्क्यांवरून आक्रसून एप्रिलमध्ये ३.८ टक्क्यांवर पोहोचली आहे.

टाळेबंदी लागू झालेल्या पहिल्याच महिन्यात, मार्च २०२० मध्ये औद्योगिक उत्पादन उणे १८.७ टक्क्यांपर्यंत आक्रसले होते. औद्योगिक निर्देशांकाला कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेष महत्त्व असते. ते देशाच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक विकास कोणत्या वेगाने होत आहे, याचे निदर्शक असते.