देशातील कारखानदारीची प्रगती दर्शविणारी महत्त्वाची आकडेवारी म्हणजे औद्योगिक उत्पादन निर्देशांक सरलेल्या ऑगस्टमध्ये ०.४ टक्के असा सुस्तावलेलाच असल्याचे शुक्रवारी सायंकाळी येथील केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या प्रसिद्धीपत्रकान्वये स्पष्ट झाले. गेल्या वर्षी ऑगस्ट २०१३ मध्येही तो ०.४ टक्के याच मंदावलेल्या पातळीवर होता. निर्मिती क्षेत्रातून घटलेले उत्पादन आणि ग्राहकोपयोगी वस्तूंना बाजारात नसलेल्या उठावाने ही स्थिती ओढवली आहे. तथापि बहुतांश विश्लेषकांनी ऑगस्टमध्ये हा निर्देशांक उंचावून अडीच टक्क्यांच्या पातळीवर पोहोचेल, अशी आशा केली होती.
चालू आíथक वर्षांच्या एप्रिल ते ऑगस्ट या पाच महिन्यांमध्ये औद्योगिक उत्पादन निर्देशांकात २.८ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तो असाच सपाटीला होता. या निर्देशांकात दोन-तृतीयांश हिस्सा हा निर्मिती क्षेत्राचा आहे. या क्षेत्रातील २२ उद्योग क्षेत्रांपैकी निम्म्या म्हणजे ११ उद्योग क्षेत्रांनी सरलेल्या ऑगस्टमध्ये सकारात्मक वाढ दर्शविली असली तरी, एकूण निर्देशांक १.४ टक्क्यांनी संकोचण्यात निर्मिती क्षेत्राचे मोठे योगदान आहे. ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनांत तब्बल ६.९ टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. त्यातही ऐषारामी वस्तूंची (व्हाइट गुड्स) निर्मिती १५ टक्क्यांनी घटल्याचे दिसले आहे.