पीटीआय, नवी दिल्ली : देशातील निर्मिती क्षेत्राची कामगिरी आणि उत्पादनवाढीचे प्रतिबिंब मानल्या जाणाऱ्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने (आयआयपी) सरलेल्या जून महिन्यामध्ये १२.३ टक्क्यांपुढे मजल मारल्याचे शुक्रवारी प्रसिद्ध आकडेवारीतून स्पष्ट झाले. विशेषत: पावसाळय़ाच्या तोंडावर खाणीसारख्या क्षेत्रातून उत्पादन घटल्याचा हा परिणाम असून, आधीच्या मे महिन्यात औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने १९.६ टक्के वाढ दर्शविली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

निर्मिती, ऊर्जा क्षेत्रातील मजबूत कामगिरीमुळे सलग दुसऱ्या महिन्यात औद्योगिक उत्पादनाने दुहेरी अंकातील वाढ कायम राखली आहे. औद्योगिक उत्पादन निर्देशांक हा देशाच्या उद्योग क्षेत्राच्या गतिमानतेचा सूचक मानला जातो. गेल्या वर्षी याच महिन्यात (जून २०२१) तो १३.८ टक्के नोंदविण्यात आला होता. 

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, या निर्देशांकातील महत्त्वाचा घटक म्हणजे निर्मिती क्षेत्राने जून महिन्यात १२.५ टक्के वाढ नोंदवली आहे. खाणकाम तसेच वीजनिर्मिती क्षेत्राने अनुक्रमे ७.५ आणि १६.४ टक्के दराने वाढ साधली आहे. औद्योगिक उत्पादनाची तिमाहीतील कामगिरी गेल्या वर्षांच्या तुलनेत मात्र काहीशी निराशाजनक राहिली आहे. एप्रिल ते जून २०२२ या तिमाहीत औद्योगिक उत्पादन निर्देशांकाने १२.७ टक्के वाढ साधली. जी गतवर्षी याच काळात ४४.४ टक्के राहिली होती. ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्राने मात्र निराशा केली असून तो वर्षभरापूर्वीच्या २८ टक्क्यांवरून २३.८ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे.

टाळेबंदी लागू झालेल्या पहिल्याच महिन्यात, मार्च २०२० आणि एप्रिल २०२० मध्ये औद्योगिक उत्पादन अनुक्रमे उणे १८.७ टक्के आणि उणे ५७.३ टक्क्यांपर्यंत आक्रसले होते. निर्देशांकाला कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेत विशेष महत्त्व असते. ते देशाच्या अर्थव्यवस्थेत औद्योगिक विकास कोणत्या वेगाने होत आहे, याचे निदर्शक असतो.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Industrial production rate slips of productivity growth ysh
First published on: 13-08-2022 at 00:02 IST