नवी दिल्ली: आभासी चलनाच्या वाढत्या व्यवहारांना लगाम लावण्यासाठी केंद्र सरकारने घाईघाईने कोणत्याही निर्णयावर पोहचण्याआधी सर्वंकष विचारासह दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन कूट चलन व्यवहारांशी संबंधित उद्योगांच्या प्रतिनिधींकडून बुधवारी करण्यात आले. काही अपवादांसह आभासी चलनावर बंदी घालणारे विधेयक संसदेत सादर केले जाण्याच्या वृत्ताने खळबळ उडवून दिली असून, गुंतवणूकदारांनीही संयम व सबुरी राखण्याचे त्यांनी आवाहन केले. 

येत्या २९ नोव्हेंबर रोजी सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात खासगी आभासी चलन नियमनाविषयी विधेयक लोकसभेच्या विषयसूचीवर आहे. ‘आभासी चलन आणि अधिकृत डिजिटल चलन विधेयक, २०२१’ या नावाच्या विधेयकाद्वारे रिझव्‍‌र्ह बँकेकडून भविष्यात जारी करण्यात येणाऱ्या अधिकृत डिजिटल चलनाच्या निर्मितीसाठी सोयीस्कर प्रणाली तयार करणार आहे. आभासी चलनाच्या सर्व प्रकारच्या व्यवहारांवर देशात बंदी आणणाऱ्या विधेयकाबाबत चर्चेचा परिणाम म्हणून बुधवारी बिटकॉईनसह वेगवेगळ्या आभासी चलनाचे मूल्य १५ ते २० टक्कय़ांपर्यंत घसरले.

देशात आभासी चलन वापरण्याऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे सरकार आभासी चालनाबाबत काहीही निर्णय घेताना या मोठय़ा संख्येने वाढत असलेल्या गुंतवणूकदारांच्या आकांक्षा पूर्ण करेल, अशी अपेक्षा ‘बाययूकॉइन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवम ठकराल यांनी व्यक्त केली. आभासी चलनावरील कर आकारणी, कूटचलनाची सूचिबद्धता आणि ‘फाइलिंग’बाबत त्वरित स्पष्टता येत असल्यास ते स्वागतार्हच ठरेल, असे त्यांनी सांगितले.

सरकारशी विविध व्यासपीठांवर गेल्या काही आठवडय़ांत झालेल्या चर्चेवरून, ग्राहक-गुंतवणूकदारांचे संरक्षण, आर्थिक व्यवस्थेची स्थिरता आणि ब्लॉकचेन तंत्रज्ञानात्मक क्रांतीचा लाभ घेण्याला चालना या संबंधाने व्यापक एकमत घडत असताना दिसून आले आहे, असे मत कॉइनस्विच कुबेरचे संस्थापक  अनिल सिंघल यांनी नमूद केले.

समभाग गुंतवणुकीपेक्षा व्याप मोठा

भारतीय भांडवली बाजारातील ऑक्टोबर २०२१ अखेर एकूण गुंतवणूकदारांची संख्या ७.४ कोटी होती आणि तर त्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे एकूण प्रमाण २७४ लाख कोटी रुपयांच्या घरात आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची संख्या ११.४ कोटी असून, म्युच्युअल फंड व्यवस्थापनाखालील एकूण मालमत्ता ३७.३ लाख कोटी रुपये आहे. त्या उलट ‘इंटरनेट अँड मोबाइल असोसिएशन ऑफ इंडिया’, ‘ब्लॉकचेन अँड क्रिप्टो अ‍ॅसेट्स कौन्सिल’, ‘क्रिप्टो एक्स्चेंज’ यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार, भारतीयांनी आभासी चलनात एकूण ६ लाख कोटी रुपयांचा निधी गुंतविला आहे. आभासी चलन बाळगणाऱ्या लोकांची संख्या जगात सर्वाधिक १०.०७ कोटी भारतात आहे.