टाळेबंदीच्या तिसऱ्या महिन्यात देशातील महागाई दर कमी झाला असला तरी अन्नधान्याची किंमतवाढ मोठय़ा फरकाने झाली आहे.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग खात्यातर्फे शुक्रवारी उशिरा किरकोळ, तर सोमवारी घाऊक महागाई निर्देशांक जाहीर करण्यात आला. यानुसार मेमधील किरकोळ ग्राहक किंमत निर्देशांक ९.२८ टक्के  नोंदला गेला, तर अन्नधान्याची चलनवाढ १५१.०९ टक्के  नोंदली गेली. गेल्या महिन्यात घाऊक किं मत निर्देशांक उणे ३.२१ टक्के नोंदला गेला. तो ४.५ वर्षांच्या तळात विसावला आहे. मात्र या दरम्यान अन्नधान्याचा किंमत निर्देशांक १.१३ टक्के झाला आहे. या गटात डाळींच्या किंमती दुपटीने वाढल्या आहेत.

निर्यातीत मेमध्ये घसरण

देशाची निर्यात मेमध्ये ३६.४७ टक्क्यांनी घसरली आहे. सलग तिसऱ्या महिन्यात कमी होताना निर्यात १९.०५ अब्ज डॉलरवर येऊन ठेपली आहे.

तेल, वस्त्र, अभियांत्रिकी, रत्ने तसेच दागिने यांना असलेली विदेशातील मागणी रोडावल्याने भारतीय निर्यातीला फटका बसला आहे. गेल्या महिन्यात देशाची आयात ५१ टक्क्यांनी कमी होत २२.२ अब्ज डॉलर झाली आहे. यामुळे गेल्या महिन्यातील भारताची व्यापार तूट ३.१५ अब्ज डॉलर नोंदली गेली आहे. वर्षभरापूर्वीच्या याच कालावधीतील १५.३६ अब्ज डॉलरच्या तुलनेत यंदा त्याबाबत दिलासा आहे. आयातीमध्ये भारताची तेल आयात मेमध्ये ३.४९ अब्ज असून त्यात वार्षिक तुलनेत ७१.९८ टक्के  तर सोने आयात ९८.४ टक्क्यांनी कमी होत १२.४४ अब्ज डॉलर झाली आहे.

औद्योगिक उत्पादनात एप्रिलमध्ये  घसरण

शुक्रवारी उशिरा जाहीर झालेल्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकानुसार एप्रिल २०२० मध्ये भारताच्या औद्योगिक उत्पादनात ५५.५ टक्के घट झाली. औद्योगिक उत्पादन घसरण्यास ग्राहकोपयोगी वस्तूंच्या उत्पादनातील ९५.७ टक्के आणि भांडवली वस्तूंच्या उत्पादनातील अनुक्रमे ९२ टक्के घट कारणीभूत ठरली. टाळेबंदीला सुरुवात झाल्याने मार्च २०२० औद्योगिक उत्पादन निर्देशांकात १८.३ टक्के घट झाली होती. टाळेबंदीत शिथिलता आल्याने मे आणि जून महिन्यांच्या औद्योगिक उत्पादन निर्देशांकात मोठी सुधारणा दिसून येईल, असे चित्र आहे. एप्रिल महिन्यात सर्वच औद्योगिक क्षेत्रात घट दिसून आली. मागील औद्योगिक निर्देशांकांचे मुख्य घटक असलेल्या खनिकर्म २७.४ टक्के वीज उत्पादन २२.६ टक्के घट झाली.