मुंबई : दिवसेंदिवस खोलात जात असलेले रुपयाचे मूल्य, महागाईचा भडका आणि तो काबूत आणण्यासाठी कर्जाच्या हप्तय़ांचा भार वाढविणारी व्याजदरातील वाढ, अशा या आव्हानात्मक परिस्थितीचे देशाच्या अर्थव्यवस्थेत उंच-सखल लाटा निर्माण करणारे परिणाम दिसत आहेत. गुंतवणुकीच्या वेगवेगळय़ा पर्यायांवर या अस्थिर वातावरणाचा बरा-वाईट प्रभाव दिसून येतो. अशा स्थितीत पैशाला मोठे बनविणाऱ्या गुंतवणुकीच्या वाटा सांगणाऱ्या ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

क्वांटम म्युच्युअल फंड प्रस्तुत ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ हा गुंतवणूक जागर येत्या मंगळवारी, ७ जून रोजी सायंकाळी ६ वाजता दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून पार पडणार आहे. चलनवाढ आणि चढय़ा व्याजदराच्या काळात गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावयाचे पैलू व करावयाचे बदल याबद्दल वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी हे मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रोते गुंतवणूकदारांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरेही यानिमित्ताने मिळविता येतील.   

आपल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि परताव्याचा हा पैलू त्या गुंतवणुकीला असणाऱ्या जोखमीचा पदर कसा यावरूनही ठरतो. म्हणजे महागाई जितकी वाढत जाईल तितकी ती गुंतवणुकीवरील परताव्याचा घास घेत जाईल. एकंदरीत गेल्या काही महिन्यांतील शेअर बाजारातील वादळी चढ-उतारातही याचे प्रतिबिंब उमटलेले आहे. व्याजदरातील वाढ जरी बँकांतील मुदत ठेवीदारांसाठी वरदान ठरणार असली तरी ती कर्जदारांसाठी त्रासदायक आहे. कर्जाचे वाढलेले हप्ते हे प्रसंगी कुटुंबासाठी आखलेल्या अंदाजपत्रकाची घडी विस्कटणारे ठरू शकतील. हे टाळण्यासाठी या काळात बचत कशी व कुठे करावी, म्युच्युअल फंडांमध्ये सुरू असलेल्या ‘एसआयपी’चे काय करावे, नवीन पर्याय कोणते हे जाणून घेण्यासाठी ‘लोकसत्ता अर्थसल्ला’मध्ये सहभागासाठी नि:शुल्क नोंदणी आवश्यकच आहे.

कधी : मंगळवार, ७ जून २०२२,

वेळ : सायंकाळी ६ वाजता 

वक्ते : कौस्तुभ जोशी

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inflation money involved risk interest rate hikes guidance loksatta arthasalla safe ways ysh
First published on: 03-06-2022 at 00:38 IST