जानेवारीच्या घाऊक किमतींवर आधारीत महागाईचा दर ५.५% असा आठ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर रोडावला आहे. सरलेल्या डिसेंबर महिन्यात हा दर ६.२% असा होता. दिलासादायी बाब म्हणजे सलग दुसऱ्या महिन्यात महागाई दरात घसरण झाली असून, दिवाळीच्या तोंडावर भडका उडालेल्या कांद्याच्या भावात ३०० टक्क्य़ांनी आलेल्या उताराने महागाई दरातील घसरणीला मोठा हातभार लावला आहे.
या महागाई निर्देशांकाचा घटक असलेल्या अन्नधान्यांच्या किमतीत झालेली मोठी घसरण एकूण दरात घसरणीला कारणीभूत ठरली आहे. त्या तुलनेत इंधन घटकाच्या किमतीत जानेवारीत मामुली वाढ दिसून आली.
अन्न घटकाच्या किमती कमी येण्यास मुख्यत्वे कांद्याच्या किमतीतील नरमाईचा परिणाम महत्त्वाचा ठरला. जानेवारीत कांद्याच्या किमतीत अवघी ६.६% वाढ झाली. मागील वर्षी जानेवारीत कांद्याच्या किमती १५२.२% भडकल्या होत्या. त्यावेळी अर्थमंत्र्यांनी कांदा ही जीवनावश्यक गोष्ट नाही असे वक्तव्य करून महागाई निर्देशांकाची फेररचना करण्याचा विचार बोलून दाखविला होता. अन्नधान्य गटात भाजीपाला जानेवारीत लक्षणीय स्वस्त झाला. बटाटे २१.७% ओसरले, तांदूळ (१३.४%), गहू (७.१%) यांच्या किमतीत वाढ मागील वर्षांच्या तुलनेत कमी झाली. फळे (५.३%) आणि दूध (७.२%) हेही मागील वर्षांच्या तुलनेत कमी दराने वधारले. अंडी, मासे आणि अन्य मासाहारी पदार्थाच्या किमतीत १०.९% अशी माफक वाढ दिसून आली.
इंधन वगळता बिगर अन्नधान्य घटकांतही महागाईचा दर सरलेल्या जानेवारीत आधीच्या वर्षांतील याच महिन्यातील १३% तुलनेत ४.४% वाढ झाली. इंधनाच्या किमतीतील वाढ मात्र दोन अंकी स्तरावर कायम आहे. गेल्या वर्षी जानेवारीत त्या ९.३ टक्क्य़ांनी वाढल्या, तर यंदाच्या जानेवारीत वाढीचा दर १०% होता.